About

Sunday 13 March 2016

मायमराठी आणि इंग्रजी

मराठी मातृभाषा असणाऱ्या मराठी भाषिक लोकांना एकूणच मराठी बद्दल प्रेम व अभिमान कमी आहे हे वास्तव आहे. विशेषतः इंग्रजीला इतके मानाचे स्थान खुद्द इंग्लंड मध्ये नसेल जितके महाराष्ट्रात आहे. मागची पिढी काही अंशी मराठी शाळांमधून शिकली तरी हल्ली आपला पाल्य मराठी शाळेत पाठवणे अप्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले आहे.  सध्या मराठी शाळांना अत्यंत वाईट दिवस आहेत. मराठी शाळांना विध्यार्थी मिळणे दिवसेंदिवस दुरापास्त होत चालले आहे. मराठी शाळांतील अनेक तुकड्या, वर्ग बंद पडून शिक्षक अतिरिक्त ठरत सरप्लस करून घरी बसवले जात आहेत. अनेक शाळा विद्यार्थाअभावी बंद पडत आहेत. मराठी भाषा हा मुद्दा बनवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेणाऱ्यांची मुले आणि ते स्वत: देखील इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच शिकलेले असतात. मराठी शाळांमध्ये दुय्यम प्रतीचे आणि निकृष्ट दर्जाचे शिक्षण मिळते हा सार्वत्रिक समज रूढ झाला आहे.

शाळांमध्ये जेव्हा जागा भरतीसाठी मुलाखती असतात तेव्हा मराठी विषयाच्या शिक्षकाकडे बघण्याचा दृष्टीकोन देखील अत्यंत तुच्छतेचा असतो. संस्थापक शिक्षकांना शाळेत नोकरी देऊन त्यांच्यावर जे थोर उपकार करतात त्या उपकाराची परतफेड म्हणून शिक्षकांना डोनेशन द्यावे लागते. जर तुमचा विषय इंग्रजी असेल तर तुमची डोनेशनची रक्कम चालू ' बाजारभावाप्रमाणे ' १२ लाख ते १५ लाख असू शकते. जर तुमचा विषय गणित असेल तर तुमचे डोनेशन १० लाख ते १२ लाख असू शकते. मात्र जर तुमचा विषय मराठी असेल तर तुमच्या डोनेशनची बोली १५ लाखांच्या पुढे सुरु होते. ती २० लाख किंवा अधिकही असू शकते.

तुम्ही जर इंग्रजीत संभाषण करू शकत असाल तर तुम्ही उच्चविद्याविभूषित असणार यात कोणालाही संशय वाटत नाही. इंग्रजी बोलू शकणाऱ्या लोकांमध्ये इंग्रजी न जमणाऱ्या लोकांबद्दल एक कुत्सित भावना आढळते. भाषा आणि शिक्षण याविषयी अनेक गैरसमज आढळतात ते या सर्व सामाजिक वास्तवाच्या मुळाशी आहेत.

पहिला आणि सर्वात मोठा गैरसमज आहे की इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. वस्तुत: जगातील अनेकानेक देश असे आहेत जिथे औषधाला देखील इंग्रजी भाषा आढळत नाही. त्यांचे सर्व शैक्षणिक व्यवहार आणि सामाजिक सोपस्कार सुखनैव सुरु असतात. यामध्ये अनेक विकसनशील आणि विकसित देश समाविष्ट आहेत. सोबत एक नकाशा जोडत आहे त्यावरून जगाच्या किती मोठ्या भागात इंग्रजी नाममात्र आहे व किती भागात तिचे अस्तित्वदेखील नाही हे स्पष्ट होईल. अगदी इंग्लंडच्या शेजारील फ्रांस, इटली इ. युरोपीय  राष्ट्रातसुध्दा  तुम्हाला इंग्रजीत पत्ता विचारला तरी कोणी सांगणे मुश्कील असते.  इंग्रजी ही जागतिक भाषा नसून ती इंग्लंड अमेरिका आणि इंग्लंड अमेरिका धार्जिणी असणाऱ्या भांडवलशाही पुरस्कर्त्या मानसिक गुलाम देशांची भाषा आहे.

दुसरा मोठा गैरसमज म्हणजे अनेक वैज्ञानिक क्लिष्ट संकल्पना मराठीतून शिकवणे किंवा समजावणे कठीण आहे. अनेक वैज्ञानिक पारिभाषिक संकल्पनांना सुयोग्य मराठी पर्यायी शब्द नाहीत. त्यामुळे मराठीतून संपूर्ण शिक्षण शक्य नाही. हे मत असणारे मायमराठीचे पुत्रच मराठीचा सर्वाधिक अपमान करत असतात. चीन आणि जपान या दोन पौर्वात्य देशांची विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील प्रगती थक्क करणारी आहे. आणि या दोन्ही देशात अथ ते इति संपूर्ण शिक्षण मातृभाषेतून दिले जाते. मातृभाषेतून शिक्षण दिल्याने अनेक पायाभूत संकल्पना पक्क्या होण्यास प्रचंड मदत होते हे सर्व भाषातज्ञानी ठासून सांगितलेले वास्तव असताना आपण जाणून बुजून इंग्रजी प्रेमापोटी मातृभाषेला पायदळी तुडवत आहोत. सर्व वैज्ञानिक संकल्पनांना पर्यायी ताकदवान शब्द शोधणे जर जपानी भाषेत शक्य होते, चीनी भाषेत शक्य होते तर ते मराठीत का अशक्य असावे?

“माझा मऱ्हाटाची बोलू कवतुके, परी अमृताही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके, मेळवीन " अस म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांचा वारसा मराठी भाषा हरवून बसली आहे का ?

मराठी ही आपली राजभाषा करून सर्व राजकीय व्यवहार मराठी भाषेत चालवण्याचा आदेश देणाऱ्या, मराठीवरील फारशी अरबी उर्दू भाषेचे आक्रमण रोखण्यासाठी व भाषाशुद्धी करण्यासाठी राजव्यवहारकोष हा ग्रंथ सिद्ध करवून घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात मराठी उपरी झाली आहे, इंग्रजी आणि हिंदीच्या आक्रमणापुढे हतबल झाली आहे हेच खरे.

मराठी भाषादिन आणि मराठी भाषा चिरायू होवो !!
©सुहास भुसे



No comments:

Post a Comment