About

Sunday 13 March 2016

कॉलेज बस

     खूप दिवसांनी बसमध्ये प्रवास केला परवा. अलीकडे बऱ्याच वर्षात बस ने प्रवासाचा योग आला नव्हता. सकाळची वेळ असल्याने बस मध्ये कॉलेजमधल्या मुलामुलींची दाटी होती. त्यांची नुसती दंगा मस्ती सुरु होती. कोड वर्ड मध्ये बोलणे, चेष्टामस्करी, थोड काही झाले की खदखदून हसणे. या वयात हसू ही खूप जास्त येत असावे. काही झाल तरी हसू, काही नाही झाल तरी हसू फुटतेच. त्यांच्या त्या कोलाहलाने बस मधले वातावरण भरून आणि भारून गेले होते. स्वाभाविकच मला आमच्या कॉलेजच्या बस ची आठवण आली. अर्थात ती तशी रुढार्थाने कॉलेजची बस नव्हती. परिवहन महामंडळाची बस. पण तिचे स्वरूप कॉलेजच्या बस सारखेच होते. त्या वातावरणातून अंग काढून घेत मी खिडकीतून बाहेर पाहत आठवणीत हरवून गेलो.

     ही बस आमच्या शेजारच्या गावातली मुक्कामगाडी असल्याने ती सकाळी ६.३० ला सुटत असे. या बसचा सर्वात जवळचा थांबा आमच्या घरापासून ५ किमी अंतरावर असल्याने पहाटे लवकर उठून आटोपून कमीत कमी ६ ला तरी घरून निघावे लागे. मी सायकल वर जात असे तेव्हा. हा सर्वात अलीकडचा थांबा असल्याने बस मध्ये आम्ही मोजकीच ४-८ मुले-मुली असत असू. हळू हळू बस मध्ये गर्दी वाढू लागे. पुढच्या गावात बस जवळ जवळ फुल होई. तिथून एक कच्चा रस्ता सुरु होई माळावरून. त्या सगळ्या माळावरून त्या गावातील लोकांची घरे रस्ता धरून पसरली आहेत. त्या गावातील लोक शेतात माळवे प्राधान्याने करतात. ही सकाळची पहिली गाडी असल्याने माल मार्केट मध्ये वेळेवर पोहोच होई. त्यामुळे या गावापासून आमच्या कॉलेज बस चे स्वरूप बदलून ती तरकारी एक्स्प्रेस बनत असे. या गावात येईपर्यत बस फुल झालेली असल्याने तिथून पुढची मुले मुली मध्ये उभे राहत रांग करत. शेतकरी आपापल्या शेतात बस थांबवून भाजीपाल्याची क्रेट मागच्या शिडीवरून वर चढवत असत.

     कधी कधी कोणीतरी टोमॅटोला पाणी दाखवत असे. रस्त्यावर उभा राहून त्याचा मुलगा हात दाखवून बस थांबवे. ड्रायव्हर ला म्हणे “थांबा जरा आमचा आबा यालाय” आणि मोठ्याने आवाज देई  "येssss आबाsssss पळ लगा, एस टी थांबलीया वाढूळ.”  तो आबा धोतराचा सोगा उचलून धरत रानातून धावत येई. आणि वाहत्या दंडात चिखलाने भरलेले पाय धुवून बस मध्ये चढे. पुढच्याच वळणावर एखादी मावशी घरातूनच हात करे. “आव आव आले थांबवा एस टी” अस ओरडत पळत पळत आपल्या अर्ध्या राहिलेल्या वेणीची शेवटची पेडे गुंतवत येई आणि एस टी. च्या दरवाज्यात उभे राहून रीबिनीचे फुल बांधून पिशवी सावरत बस मध्ये चढे. पुढच्या वळणावर अशीच एखादी मावशी बस मध्ये चढता चढता खाली उतरे. “आग्ग बय्या.. माझी पिशवीच रायली की व कंडक्टर सायेब. आले थांबा लग्गीच. हलवू नका बर्का गाडी.” अशी लाडिक विनंती करून धावत घरी जाई आणि पिशवी घेऊन परत बसमध्ये चढे.

     अश्याच प्रकारे वळणा वळणावर बस थांबत राही. कोणाचे काय राहिलेले असे तर कोणी शेतातून धावत येत असे. बाहेर हा सगळा प्रकार सुरु असे. आणि आत काय ? आतल्या दोन सीटच्या बाकड्यावर तीन किंवा शक्य तर चार जण बसलेले असत. तीन सीटच्या बाकड्यावर चार किंवा शक्य तर पाच-सहा. ड्रायव्हरची केबिन भरलेली असे. मधली उभी एक रांग कंप्लेट होऊन दुसरी रांग तेवढ्याश्या जागेत उभी राही. बस मध्ये अगदी पाय ठेवायला देखील जागा नसे. पण प्रवाश्यांचा लोंढा सुरूच असे. मग कंडक्टर ड्रायव्हरला इशारा करी. ड्रायव्हर खचकन ब्रेक मारी. इकडे सगळी रांग जिकडे कलंडता येईल तिकडे कोसळे. रांग पुन्हा उभी राहून जागा धरेपर्यंत थोडी जागा झालेली असे. अश्या प्रकारे प्रत्येक प्रवाश्याला जागा उपलब्ध करून दिली जाई तिथून पुढे. लहान मोठे, पोरी पोरे असा भेद त्या गर्दीत नाहीसा होऊन ती गर्दी जणू एक अद्वैत बनत असे माणसांचे. शेवटी शेवटी कितीही ब्रेक लावले तरी आत मुंगीही शिरू शकणार नाही अशी अवस्था बस ची होई. तेव्हा तिथून पुढची माणसे एस टी च्या टपावर बसवली जात.

     या सर्व प्रकारात ड्रायव्हर आणि कंडक्टर हे रोज त्याच रूटवरचे मुसाफिर असत. आणि सगळी पोरे पोरी आणि सगळे गाववाले त्यांच्या चांगलेच ओळखीचे असत. त्यामुळे कोणी हात केला आणि बस थांबली नाही अस कधीही होत नसे. कुठे आणि कस बसायचे हे त्या चढणाऱ्याने बघायचे. पण बस थांबणार म्हणजे थांबणारच. आणि हा सर्व दिव्य चमत्कारी प्रकार सुरु असताना देखील कंडक्टरचे पास पंच करणे आणि तिकीट फाडणे सुरुच असे. आता अश्या गर्दीतून जिथे आपला स्वत:चा  हात हलवणे देखील कोणाला शक्य नसे त्यात कंडक्टर मागे पुढे फिरत तिकिटे कशी काढत असेल याची कल्पना करून पाहावी. त्यात उभ्या रांगामध्ये जास्त संख्येने गर्दीत जागा मिळवता न आल्याने उभ्या असलेल्या मुलीच असत. कंडक्टर कडे पोरे आशाळभूत नजरेने पाहत बसत. आमच्या बस मधील ९५ % पोरांचे स्वप्न होते की कॉलेज संपवून आपण बस कंडक्टरच बनायचे.

     तर हा दिव्य प्रवास आटोपत फक्त २२ किमी अंतर तोडून सकाळी ६.३० ला निघालेली बस सुमारे ८.३० च्या आसपास इप्सित स्थळी अवतरत असे. तोवर कॉलेजमधले एक दोन पिरीयड बोंबललेले असत. सगळी पोरे पोरी धूम सुटत आपापल्या कॉलेजकडे. आणि वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक गर्दी वाहून आलेली ती बस मोकळा श्वास घेई क्षणभर. पुन्हा दुपारी साडेबाराला काही कॉलेजेस सुटत तर काही १ ला तर काही १.३० ला. पुन्हा हळू हळू बस स्थानकावर युवा महोत्सव सदृश्य वातावरण तयार होण्यास सुरवात होई. बऱ्याचदा म्हणजे महिन्यातून कमीत कमी २० वेळा काहीना काही कारणाने आमची परतीची गाडी रद्द झालेली असे. मग मुलांचे म्होरके आपापली टोळकी घेऊन नियंत्रक कार्यालयावर धावा बोलत. गोंधळ होई. विनंत्या आर्जवे होत. आंदोलने होत. काहीतरी मांडवली होऊन आमच्यासाठी एखादी गाडी अडजस्ट केली जाई.  या कारणामुळे या बस येणाऱ्या आम्हा विविध गावच्या विवीध कॉलेजमधल्या मुलामुलीत खूप एकजूट निर्माण झाली  होती.

     आमचा कॉलेज जीवनातला बहुतांश वेळ कॉलेजमध्ये कमी आणि या बस मध्ये आणि बस स्थानकावरच जास्त जात असे. अनेक प्रेमप्रकरणे या बस मध्ये घडली. हळूच कोणाच्या सॅक मध्ये प्रेमपत्रे सरकवली जात. प्रेमप्रकरणे घडली, फुलली, सफल झाली. विफल झाली. अनेकदा भांडणे झाली. वाद झाले. गोष्टी पोलीस स्टेशन पर्यतही गेल्या. प्रत्येक दिवसाच्या प्रवासाच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत. आमच्या सर्वांच्या भावविश्वात कॉलेजला कमी आणि या बसलाच जास्त महत्व होते. अशी दिव्य बस अश्या दिव्य प्रकारे अशी भव्य गर्दी घेऊन रोज न कुठे धावत असेल न कधी धावेल पुढे. आमची कॉलेज बस ती तीच एकमेवाद्वितीय !!!
©सुहास भुसे.




  

No comments:

Post a Comment