About

Friday 22 May 2015

रंगुची गल्लीवारी, इज्जत आणि बरकत

रंगु पायात पायताने सरकवत दारातूनच म्हणाली " मी जरा सखुकड़े जाऊन येते हो !"

मोरीकडे भांडी घेऊन जाणारा तिचा नवरा दगडू थबकला.

"अग आज मला भांडी धुवायला धूणी धुवायला स्वयंपाक आणि केर सारायला बी मदत करती म्हणली होतीस. उद्या म्हणजे तुमचा "अच्छे दिन"    ची सुरवात असल म्हणली होतीस. का समद 'जुमल ' होत ते ?"

त्याच बोलण संपेस्तो रंगुने लांब रान कातरले होते.
..

सखुच्या घरी चहापाणी झाल्यावर मनकी बात ला सुरुवात झाली.
सासुचा आणि नव-याचा आवडता विषय येताच रंगु रंगू लागली.

" अग माझ्या आधी यांच्या घरात सगळी बजबजपूरी करून टाकली होती या ' माँ बेटे के कारभार ने ' !! सासु सगळ चांगल चुंगल तुंप बिंप चोरून मारून ओरपायची. सासु सुटली होती अन बाकीची झाली होती पाप्याची पितर ..अन आमचे हे म्हणजे त निव्वळ ध्यान ..मौनीबाबा ..(खुसुर पुसुर खुसुर पुसुर बराच वेळ ) "

"येते ग जरा यश्वदे कड़े जाऊन .." म्हणून रंगु ने सखुचा निरोप घेतला.

..
यश्वदेशी तर रंगुचा ' पुराना नाता '
मग 'मन की बात ' ला काय तोटा ?
रंगु यश्वदेच्या गळ्यात पडून हमसुन हमसुन सांगू लागली..

" फार फार ग दुस्वास करतात माझा घरची माणस. सगळे ऐतखाऊ माजलेले बैल आहेत नुसते. मी एकटी कामाचे डोंगर उपसत असते . पण मेल्यांना जरा सुद्धा कदर नाही ग ..उलट मी काम करते म्हणून जळतात माझ्यावर मूडदे.. .(खुसुर पुसुर खुसुर पुसुर बराच वेळ ) "

" येते ग यमुना कड जाऊन " म्हणत रंगुने यश्वदेचा निरोप घेतला.

..
यमुना तर रंगुची बालमैत्रीण. तिच्याकड़े तर 'बचपन से आना जाना '
चहासंगे किरकोळ गपशप झाल्यावर खरी मन की बात सुरु झाली.
रंगु जरा जास्तच जोमात होती.

" अग तुला म्हणून सांगते यमुने माझ लगीन झाल तव्हा आमच्या फेकाडे घरान्यात काही मंता काही राम नव्हता. समद्याना लाज वाटायची आपण या फेकाडे घराण्यात जन्म घेतला म्हणून..घराला घरपण म्हणून नव्हतं बग कसल. पण मी हिथल माप वलंडल आन यांच घरच आबादान झाल बग. ह्यांची कीरत वाढली गल्लीतल्या न्हान थोर बाप्प्यांची लाइन लागू लागली आमच्या घरी माझ्यामूळ...(खुसुर पुसुर खुसुर पुसुर बराच वेळ ) "

"दिवस कलला ग पार येते मी आता " म्हणत रंगूने यमुनाचा निरोप घेतला..

" तुझ्याच घरी जातिया नव्ह " ह्या यमुनेच्या कुत्सित प्रश्नाकडे दुर्लक्ष करत तिने रान कातरले.

..
"आले व मी..जरा चहा त टाका वाइच दोन कप " पायतान काढत रंगु ने आड्डर सोडली.
दारातच पायपुसन झटकत उभा असलेला दगडू तिच्याकड कावून बघू लागला.

" रंगे का मून दिवसभर कामधंदा सोडून गावभर उंडारतीच ग ?"

रंगु ने रागाने दगडूकड़े एक तुच्छ कटाक्ष टाकला. आणि ठसक्यात म्हणाली,

" हे पाव दगडोबा , तुमासनी अक्कल मून काय ती न्हायच. आवो मी जर बाहेर फिरली नाय तर गल्लीत तुमची इज्जत कशानी वाढील. अन माणसात मी उठली बसली न्हाई त तुमच्या पीठाच्या गिरणीच्या धंद्याला बरकत कशी येईल ?"

रंगीच्या उंडारण्यामुळे आपली इज्जत कशी वाढेल आणि बरकत कशी येईल याचा हातात पायपुसन घेऊन विचार करत स्तंभित झालेल्या दगडुला तसाच सोडून रंगु कुर्र्यात आत निघुन गेली.

-@सुहास भूसे.

No comments:

Post a Comment