About

Thursday 9 July 2015

पारावरच्या गप्पा आणि सत्तेचे डोळे

" रंगे जरा देवळात जाऊन येतो ग वाइच "
दगडूने पायतान पायात सरकवत दारातूनच रंगुला आवाज दिला. दिवसभर रानात राबुन आलेला शीन देवळाच्या पारावर बसून दोस्तांसंग चार गप्पा हानल्या की वाइच हलका होत असे.
देवळाच्या पारावर चौगुल्याचा शिरप्या ,नकटा दत्तू , तिमान्या उर्फ सदया आन शिवा मास्तर ही दगडूची दोस्त मंडळी नुकतीच जमा झाली होती.

" तिमान्या, काढ चंची, वाइच पान खाऊ दे मर्दा !"पारावर आलकट पालकट बैठक जमवत दगडूनं फरमाइश केली.
चंची त्याच्यापुढ करत तिमान्यानं इचारल.
 "का र दगड्या ..लई ढेपाळल्यावनी दिसायलाच मर्दा !"
चंचीतुन दोन चांगली जूनवांन पान काढुन त्यांच्या शिरा खुडत दगडू म्हणाला,
" आर कामानं पिट्टा पडायलाय.. तिच्या बायली काय काम म्हणाव का स्वाॅंग बागायतीतल, ..कितीबी वड़ा वसरतच नाय "
शिरप्या न मान कलती करून इचारल
 "एवढा काय नांगुर वडला र दगड्या ?"
एव्हाना चांगला मस्त जमवलेला विडा तोंडात टाकत दगडू म्हणाला..
" आर काल कांद्याच्या रोपाला सारं सोडल व्हत..आज इळभर ढेकळ हावार केली रॉप टाकल भिजीवल बग ..यंदा बक्कळ कांदा करणार हाय "
शिवा मास्तरन हे ऐकून च च च केल.
"का व मास्तर..चूक चूक करायला काय झाल ?"
दगडून इचारल ..
" अरे काही उपयोग नाही बाबांनो. कांदावाला शेतकरी यंदा माती खाणार "
हे ऐकून चरका बसला दगडूला ..
"मास्तर तुमी कवपसन भाकनुक करायला लागले "

" अरे भाकनुक नाही दगडू.. अरे मोदीनी निर्यातमूल्य वाढवलय 175 रु. नी कांद्याच. आता कांदा निर्यात करने व्यापाऱ्याना परवडणार नाही. म्हणजेच निर्यात होणार नाही, मग मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यावर जे होते तेच होईल."
क्षणभर शिवा मास्तर च्या तोंडाकडे स्तब्ध होऊन बघत बसले समदे.

"जाऊंदे मरू दे तिच्यामारी कांद्याचा ह्यो न्हेमीचाच वांदा हाय, गेला बाजार उस तर कुठ जात न्हाय"
चौगुल्याच्या शिरप्याची आशा लई अनंत.


"आता हाय का , राजाला दिवाळी म्हायीतच न्हाय म्हण कि, लेका शिरप्या पुढच्या हंगामात उसाला १२०० रु टन भाव जाहीर झाला."
नकट्या दत्तू ने बॉम्ब टाकला.
"मायला कायतर बदल होन, म्हणून मुदीला डोक्यावर घेतल आमी, आन यानी त शेतकऱ्याच्या डोस्क्यावर मीरं वाटल कि ओ !"
तीमान्या हळहळला.
"अरे याचं कस झालय माहित हाय का.. तुम्हाला एक गोष्ट सांगतो"
शिवा मास्तर ची गोष्ट म्हणताच सगळे सावरून बसले.
..

"फार फार वर्षापूर्वी एका विहिरीत काही खोडकर पोर पोहत होती. दणादण उड्या ठोकत होती. पाणी उडवत होती. आणि त्यांची मौज चालली होती.आणि एक मुलगा मात्र काठावर उदास होऊन बसला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होत.
त्याला हि मौज करता येत नव्हती. कारण तो ठार आंधळा होता.
वरून शंकर पार्वतीच विमान चालल होत. पार्वतीला या पोराची फार द्या आली.
तिने शंकराकडे हट्ट धरला कि या पोराला डोळे द्या. शंकर महाज्ञानी. म्हटले नको. आग बाई तो आहे तसाच ठीक आहे.
मग काय बालहट्ट राजहट्ट आणि स्त्रीहट्ट यापुढे कोणाचे काय चालते काय?
शंकर म्हटले तथास्तु !
आणि इकडे या पोराला डोळे आले. पोरग क्षणभर बावरल. इकड तिकड बघितले. कपडे काढले अन दाणकन ठोकली कि ओ उडी.
मिनिट दोन मिनिट पोरग शांत पोहोल आणि मग ......
दावला कि ओ रंग . याच्या अंगावर उडी टाक. त्याच्या अंगावर पाणी उडव..
अस करत करत या पोराने धर पोरग कि बुडव पाण्यात...धर पोरग की बुड्व पाण्यात असा एककलमी कार्यक्रम सुरु केला.
ते दावून मंग शंकर पार्वतीला म्हणले बग मी सांगत होतो ना ते पोरग आंधळच ठीक होत म्हणून.
हे मोदी सरकारच बी असच झालय बगा. सत्ता नव्हती तवर ठीक होत. गरिबावाणी काठावर बसून तत्वज्ञान सांगत व्हते.
आता सत्ता मिळाली की चालू झाला यांचा एककलमी कार्यक्रम ' धर शेतकरी कि बुडव पाण्यात, धर शेतकरी कि बुड्व पाण्यात."
..

इकडे हसून हसून मंडळीची मुरकुंडी वळली होती.
शिरप्या लोळत होता. दत्तूच मुंडास पडल खाली. तीमान्या पोटावर हात दाबत खदखदत होता.
दगडूने हि मनसोक्त हसत डोळ्याच्या कोपऱ्यात साचलेल पाणी पंच्यान अलगद पुसलं.



No comments:

Post a Comment