About

Friday 10 July 2015

महान बोधीधर्म - १

बोधीधर्म कोण होता ? ९० % भारतीयांना हा प्रश्न विचारला तर उत्तर 'माहित नाही ' असे असेल. पण हाच प्रश्न जर चीनी किंवा जपान्यांना विचारला तर ९९ % लोक ' होय माहित आहे ' असे उत्तर देतील. यावरून बोधीधर्म हा कोणी जपानी किंवा चीनी व्यक्ती असावा अशी समजूत व्हायला काही हरकत नाही. पण बोधीधर्म हा भारतीय होता. भारतीयांना माहित नसणारा पण चीनी, जपानी, कोरियन लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कोण होता हा गूढ भारतीय ?

निळ्या डोळ्यांचा बौद्ध भिक्खु धामु ऊर्फ बोधीधर्म

आज हॉलीवूडच्या एक्शनपटांत कुंग फु चा बोलबाला आहे. मार्शल आर्ट मध्ये सर्वात प्रमुख आहे ती कुंग फु ही आत्मरक्षा विद्या. आणि या विद्येचे महारथी महानायक जाकी चेन, ब्रूस ली, जेट ली जगभरातील चित्रपटरसिकांच्या गळ्यातील ताईत आहेत. कियोनो रीव्युज हा हॉलीवूडचा महानायक तर कुंग फु च्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे. चीनच्या प्राचीन संस्कृतीचे गौरवशाली प्रतिक बनला आहे तो हा कुंग फु. चीनी संस्कृतीविषयी चर्चा सुरु आहे आणि कुंग फु चा विषय नाही असे होत नाही. किंवा चीनी चित्रपट आहे आणि त्यात कुंग फु नाही असेही उदाहरण अपवादात्मकच.

कुंग फु ही  एक श्रेष्ठ दर्जाची आत्मरक्षात्मक युद्धकला आहे. शरीराच्या अत्यंत वेगवान हालचालीसाठी ही विद्या प्रसिद्ध आहे. आपल्या योगामध्ये जसे अत्यंत उच्च पातळीवर गेल्यावर कुंडलिनी शक्ती जागृत होतात असा समज आहे. तसाच कुंग फु मध्ये देखील अंतिम कौशल्य म्हणून अशीच गूढ विद्या आहे. जी शारिरी अवयवांच्या अत्युच्च प्रदर्शनाला मदत करते. कुंग फु शिकवणाऱ्या अनेक गुरुशिष्य परंपरा चीन जपान मध्ये प्रसिद्ध आहेत. या विद्येचे प्रशिक्षण देणारी अनेक केंद्रे प्राचीन काळापासून चीन मध्ये आहेत. आता या सर्व केंद्रांचे मॉडर्न कुंग फु स्कुल मध्ये रुपांतर झाले आहे. या सर्व प्रशिक्षण केंद्रांमध्ये सर्वात आदिम, सर्वात प्राचीन, सर्वात मानाचे असे कुंग फु प्रशिक्षण केंद्र आहे शाओलीन टेम्पल. आणि हे विद्यालय स्थापन करून चीनी लोकांना कुंग फु शिकवला तो बोधीधर्म या भारतीयाने.



हा धक्का अनेक भारतीयांना सहन होणार नाही. अनेकांचा विश्वास बसणार नाही. आधीच वैदिक विमाने वगैरेवरून प्राचीन भारतीय ज्ञानाचा उपहास करण्याचे अनेक विद्वानांचे कार्य जोरात सुरु आहे. ताजमहाल हा तेजोमहल होता असे सांगणारे, त्यासाठी अनेकानेक संदर्भ पुरावे देणारे पु ना ओक या विद्वानांच्या लेखी वेडपट गृहस्थ ठरतात.प्राचीन दैदीप्यमान काळ, मग सांस्कृतिक धार्मिक आक्रमणे आणि मग हजारो वर्षांची गुलामगिरी, जातीभेद, उच्चनीचतेने भंगलेला समाज आणि मग अर्चाचीन लोकशाही कम ठोकशाही असे भारताच्या सामाजिक सांस्कृतिक प्रवासाचे ढोबळ टप्पे आहेत. या सर्वांचे दोन प्रमुख परिणाम झाले.

1. आपले प्रगत ज्ञान त्याचे संदर्भ पुरावे त्याचा वारसा आपल्यापासून हिरावला गेला.
2.आणि भारतीय समाजाची मानसिकता पराभूत, गुलाम बनली.

दोन्ही परिणाम विघातकच. पण तुलनेने दुसरा परिणाम जास्त घातक ठरला, ठरतोय. आपल्या देशात काही चांगल होत. ते श्रेष्ठ दर्जाच होत हे लोकांना खरेच वाटत नाही. आणि त्याचाच ओघाने येणारा परिणाम म्हणजे काही चांगल घडू शकत किंवा आपण घडवू शकू यावरही विश्वास न बसणे. संपूर्ण समाजमनाचा नकारात्मकतेच्या दिशेने प्रवास आणि कृतीशुन्यता.

या विषयीचा गटेचा एक सिद्धांत माझा खूप आवडता आहे. माझ्या लिखाणात मी तो वारंवार मांडतो. आणि भारताच्या अधोमुखी प्रवासाचे आणि गुलाम पराभूत मानसिकतेचे ते एक प्रमुख कारण आहे.

“ज्याची जपणूक करावी, ज्याचे रक्षण करावे, ज्याचा विकास करावा असे काहीही नाही  अशी एकदा समाजाची मानसिकता तयार झाली की कृती करण्याचे काही कारणच उरत नाही.”

यासाठीच प्राचीन भारतीय तत्वज्ञान प्राचीन भारतीय स्थापत्यविद, दार्शनिक, वैज्ञानिक यांची भारतीयांना नव्याने ओळख करून घेण्याची गरज आहे. चार्वाक, बोधीधर्म किंवा मयासुरासारखा अतिप्राचीन स्थापत्यविद यांच्यावर संशोधने व्हायला हवीत. त्यांचे ज्ञान, त्यांच्या कला यांचा अभिमान भारतीयांच्या मनात पुनश्च रुजायला हवा.

बोधीधर्माविषयी सविस्तर पुढील लेखात  ...

-सुहास भूसे.

बोधीधर्म ऊर्फ दारुमु यांचे एक प्राचीन जपानी चित्र

No comments:

Post a Comment