About

Saturday 11 July 2015

महान बोधीधर्म - ३

    बोधीधर्म साधारण इ.स. ५२० ते इ. स. ५३६ या कालखंडात चीनला गेला असावा. या काळात चीनमध्ये एक भयंकर संकट येणार आहे. अशी तात्कालिक चीनी भविष्यवेत्त्यांनी भविष्यवाणी केली होती. सुरवातीला बोधीधर्म म्हणजेच ते संकट असे समजून चीनी लोकांनी त्याची अवहेलना केली. काही काळाने चीनमध्ये एका भयंकर अनाकलनीय रोगाची साथ आली. अनेक लोक या रोगाचे शिकार होऊन धडधड मरण पावू लागले. तेव्हा बोधीधर्माने आपल्या दिव्य औषधी ज्ञानाचा वापर करून या रोगावर औषधी तयार केली व या रोगाच्या साथीचे उच्चाटन केले. बोधीधर्माप्रती लोकांमध्ये एक आदराची भावना उत्त्पन्न झाली. त्यानंतर चीनवर दुसरे महाभयंकर संकट आले. ते म्हणजे परचक्र. यावेळेपर्यंत चीनी लोक बोधीधर्म फक्त औषधी विद्येचे ज्ञानी आहेत असे समजत होते. पण या प्रसंगी बोधीधर्माच्या युद्धकलेचा आणि संमोह्न विद्येचा त्यांना परिचय झाला. पुढे लोकांनी त्यांना ही विद्या आपल्यालाही शिकवण्याची बोधीधर्माला विनंती केली. व ती मान्य करून बोधीधर्माने शाओलीन टेंपल या महान कुंग फु प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. शाओलीन टेंपल मध्ये महागुरू म्हणून बोधीधर्म उर्फ चिन्यांचा लाडका धामू याचा पुतळा शीर्षस्थानी आहे. त्याच्या पुढे नतमस्तक होऊनच कुंग फु विद्येचे धडे गिरवले जातात.
 
    बोधीधर्म हा चीनमधला एक प्रमुख पुराणपुरुष असल्याने त्याच्याविषयी अनेक आख्यायिका आणि दंतकथा चीनमध्ये प्रचलित आहेत. त्यापैकी काही निवडक पुढील प्रमाणे ..

आख्यायिका १

बोधीधर्मांची कीर्ती ऐकून एकदा चीनच्या सम्राटाने त्यांना भेटीस बोलावले. त्यांना आपण प्रजेसाठी, दीन दुबळ्यासाठी करत असलेले धर्मकार्य मोठ्या आत्मीयतेने दाखवून त्यांना विचारले.
“ हे भिक्षु, मी करत असलेले हे श्रेष्ठ कार्य पाहून आपणास काय वाटते ? धर्माच्या व धर्मकार्याच्या दृष्टीने माझी योग्यता काय ?”
बोधीधर्म आधीच ध्यानाचार्य ! ते फारस बोलत नसत. त्यांनी अल्पाक्षरी उत्तर दिले.
“काहीच योग्यता नाही”
यावर तो सम्राट अतिशय चिडला. मोठ्याने ओरडला,
“ कोण आहे हा जो सम्राटाशी अश्या अपमानास्पद तऱ्हेने बोलण्याचे दुस्साहस करत आहे?”
यावर बोधीधर्माने पुन्हा शांतपणे अल्पाक्षरी उत्तर दिले.
“कोणीच नाही व काहीच नाही !”

सम्राट हे उत्तर ऐकून क्षणभर स्तब्ध झाला. त्याच्या अंतर्मनात एक नाद उठला. त्याला तीव्रतेने जाणवले की आपल्या धनाच्या बळावर तो करत असलेल्या समाजकार्य व दानधर्माचा त्याला गर्व झाला आहे. समोर उभ्या असलेल्या त्या नंगधडांग भिक्खू कडे त्याने पाहिले. त्याची वाढलेली दाढी व फाटके कपडे यामागे दडलेलं एक महाज्ञानी, निगर्वी, निर्व्याज व्यक्तिमत्व त्याला जाणवले. आणि त्याला हेही जाणवले की या भिक्खूपुढे आपण खऱ्या अर्थाने दरिद्री आहोत. कंगाल आहोत. हा भिक्खू ‘ कोणीच नाही व काहीच नाही.’ त्याला त्या क्षणी आत्मज्ञानाची प्राप्ती झाली.



 आख्यायिका 2.

 चहा पेय म्हणून प्रचलित करण्याचे व त्याचा दैनंदिन जीवनात सातत्याने वापर करण्याचे प्रथम श्रेय चिन्यांना जाते हे तर आपणास ठाऊक आहेच. पुढे बौद्ध भिक्खुनीच हा चहा भारतात आणला. व आज तो आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग बनला आहे.

ही दुसरी आख्यायिका मोठी गंमतीशीर आहे. व चहाच्या शोधाशी निगडीत आहे. बोधीधर्म चीनमध्ये असताना सलग नऊ वर्षे एका मंदिरात त्याचे वास्तव्य होते. त्याने मंदिरातील एकाच भिंतीकडे पाहून ध्यानधारणा केली. सतत त्याच भिंतीकडे पाहिल्याने थकून त्याला झोप आली. जागा झाला तेव्हा त्याला साधनेच्या मध्येच झोप लागल्याने स्वतःचीच घृणा वाटली. त्यामुळे त्याने स्वतःच्या डोळ्यांच्या पापण्या कापल्या आणि तिथेच जमिनीवर फेकल्या. आख्यायिकेनुसार, त्या जागी चहाचे झुडूप उगवले. बोधीधर्माने त्या झुडुपाच्या पानांची चव घेतली आणि अमृतदायी चवीमुळे तो सदैव ताजातवाना आणि जागा राहिला.

या व अश्या अनेक आख्यायिका आणि दंतकथा चीनी साहित्य आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. एकंदरच बोधीधर्माने चीनी भावविश्व पूर्णपणे व्यापून टाकले आहे.



7 am arivu अर्थात 7 th sense

हा एक नितांतसुंदर तमिळ चित्रपट आहे. नेहमीप्रमाणेच हॉलीवूडपटांच्या तोंडात मारेल अश्या उच्च तंत्रज्ञानाने परिपूर्ण ज्याच्यासाठी तमिळ चित्रपट प्रसिद्ध आहेत. याची कथा ही बोधीधर्म याच्या भोवती गुंफली आहे. अनेक भारतीयांना बोधीधर्म या हरवलेल्या महान भारतीयाशी परिचित करून देण्याचे प्रमुख कार्य हा चित्रपट करतो. मला स्वत:ला काही दिवसांपूर्वी हा सिनेमा पाहूनच बोधीधर्म कोण ते माहित झाल.
सुरवातीची १५ मिनिटे आणि मुख्य थीम सोडली तर हा चित्रपट बोधीधर्माचा फारसा इतिहास दाखवत नाही. तरीही अवश्य पाहावा असा आणि बोधीधर्मांवरचा एकमेव चित्रपट आहे.


     अश्या अनेकानेक महान व्यक्तींचं कार्य भूतकाळाच्या पडद्याआड दडल आहे. या देशातील प्राचीन ज्ञान, विज्ञान, कला, स्थापत्य, अध्यात्म किती प्रगत होत याच्या पाउलखुणा लुप्त झाल्या आहेत. लुप्त होत आहेत. बोधीधर्मासारखे अवचित गवसणारे तुटक तुटक धागे आपण जपायला हवेत. पसरवायला हवेत. अजून खूप माहिती अज्ञात आहे. बोधीधर्माबद्दल.. गुगला , वाचा , शोधा, संशोधन करा. आपल्या महान संस्कृतीतील महानायकाच्या हरवलेल्या पाउलखुनांचा शोध घ्या.



     ही लेखमाला आपल्या विद्येची दुदुंभी सातासमुद्रापार वाजवणाऱ्या आणि गाजवणाऱ्या इतिहासाच्या महानायक बोधीधर्माला समर्पित _/\_

- सुहास भूसे


No comments:

Post a Comment