About

Saturday 16 May 2015

अघोर साधू आणि अघोरी साधना.

 "सैतानालाही लाजवेल असे अघोरी कृत्य"
असा वाकप्रचार नेहमी वापरला जातो. म्हणजे नृशंस किंवा पाशवी कृत्यासाठी आपण ' अघोरी ' या शब्दाची योजना करतो. ती कितपत बरोबर आहे , योग्य आहे हे हा लेख वाचल्यानंतर आपणच ठरवा.
अघोरी साधूंविषयी आणि त्यांच्या पंथाविषयी दुर्दैवाने फारच कमी माहिती उपलब्ध आहे. जी माहिती उपलब्ध आहे त्यात अघोरींविषयीच्या गैरसमजांचाच भरणा अधिक आहे. एक भयचकित करणारे वलय पुरातन काळापासून अघोर पंथाभोवती राहिले आहे. अघोरी साधूंच्या अलौकिक शक्ती, त्यांची अमानवी साधना याविषयीचे गूढ कायम आहे. साधारणत: सर्वसामान्यांना अघोरी साधूंविषयी जी माहिती असते ती अशी -
1. अघोर साधू स्मशानात साधना करतात.
2. मानवी मृतदेहाची राख ते अंगाला फासतात.
3. अघोर साधू मानवी कवठ्यांची माळ गळ्यात घालतात.
4. अघोर साधू मानवी कवठी भोजनपात्रासारखी वापरून त्यात भोजन करतात.
5. अघोर साधू नरमांस भक्षण करतात.
6. हठयोगात ते प्रवीण असतात.
7. अघोर साधूंच्या अंगात अलौकिक शक्ती असतात.
ही किंवा यापैकी काही माहिती सर्वसामान्यांना असते. यातील ब-याच किंवा सर्वच गोष्टी ख-या आहेत. आणि चार भिंतीत विश्व सामावलेल्या माणसांना अंगावर भयाने काटा आनण्यासाठी या गोष्टी पुरेश्या आहेत. त्यामुळ अघोर साधू म्हटल की सर्वांची तंतरते. खर तर अघोर साधूंना भिण्याचे काहिएक कारण नाही. ही भीति निव्वळ अज्ञान व गैरसमजापोटी आलेली आहे.


ड्रेक ब्रॉकमन नांवाच्या इंडियन मेडिकल ऑफिसरनें मिळविलेली एका अघोर्‍याची जन्मकथा एच. बालफर या इंग्लिश लेखकाने लिहून ठेवली आहे. तो सांगतो..
' हा मनुष्य जातीनें लोहार असून पंजाबांतील पतियाळा संस्थानांत राहात असे. तो प्रथम भीक मागत असे, पण पुढें एका अघोर्‍यानें त्याला आपला शिष्य केला. तो बदरीनारायण करून नंतर नेपाळांत गेला; तेथून जगन्नाथाला जाऊन शेवटीं मथुरा व भरतपुर येथें आला. भरतपुरला त्याची चौकशी झाली. त्यानें अशी जबानी दिली कीं,'' मी सध्यां कोणत्याहि जातीकडून अन्नग्रहण करितों, व जातीचा विधिनिषेध मी मानीत नाहीं. मी कोणाच्याहि हातचें खातों. मी स्वत: नरमांस खात नाहीं पण माझ्या पंथांतील कांही जणांना तें खाऊन मृतांना पुन्हां सजीव करण्याची ताकद आहे. कांहींजवळ मंत्रसामर्थ्य असतें व तें मनुष्यांचे मांस खातात; पण माझ्यांत हें सामर्थ्य नसल्यानें मला तशी ताकद नाहीं. मी फक्त मनुष्याच्या डोक्याच्या कवटींतून अन्न खातों व पाणी वगैरे पितों. याशिवाय मी घोड्याव्यतिरिक्त सर्व मृत जनावरांचें मांस भक्षण करितों. घोडा निषिद्ध मानला आहे म्हणून खात नाहीं. माझे सर्व जातबांधवहि माझ्याप्रमाणेंच घोड्याच्या मांसाशिवाय सर्व मांस खातात.''

अश्या या गूढवलयांकित आणि विस्मित करून सोडणा-या अघोर पंथाविषयी आणि त्यांच्या तत्वज्ञानाविषयी अधिक जाणून घेवुया.


...............

अघोर संप्रदाय हा हिंदूस्थानातील सर्वात जूना संप्रदाय. याचा निश्चित कालावधी सांगता येत नसला तरी तो कापालिक पंथाच्या समकालीन असावा असे मानले जाते. हिंदुस्थानातील प्राचीन शैव धर्माच्या दिव्य परंपरेचा वारसा बाळगनारा हा पंथ आहे. याचा सर्वाधिक जूना उल्लेख सापड़तो तो युवान श्वांग या चीनी प्रवाश्याच्या प्रवासवर्णनात...अंगाला राख फांसून, कवट्यांच्या माळा धारण करणारे (कपालधारी), नागवे साधू त्याने हिंदुस्थानांत पाहिले असल्याचे लिहून ठेवले आहे.

अघोर तत्वज्ञान :-

अघोर या शब्दाचा अर्थ ' अ + घोर ' जो घोर नाही असा...जो भीतिदायक नाही असा..ज्याच्या ठाई कोणताही भेदभाव नाही असा.. सरळ ..स्थितप्रज्ञ .
 'स्थितप्रज्ञ ' ही अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीची मानसशास्त्रीय संज्ञा आहे. नुसत सुख आणि दुःख यामध्ये जो स्थिर असतो तो स्थितप्रज्ञ नव्हे. तर जगातील सर्व चराचर गोष्टींकड़े जो समदृष्टीने पाहतो ज्याला कशाचाही मोह नाही आणि जो कशाचीही घृणा करत नाही तो स्थितप्रज्ञ ..तो अघोर!

याच तत्वज्ञानात अघोरींच्या गूढ , विक्षिप्त आणि भयावह जीवनशैलीचा उगम आहे.

मृत मानवी शरीराचे मांस माणूस त्याज्य मानतो. त्याची घृणा येते म्हणून अघोरी ते मांस खातात. या मागे घृणेवर विजय मिळवणे हा एकमेव उद्देश आहे. मानवी समाज ज्या ज्या गोष्टींची घृणा करतो त्या गोष्टी अघोरी अंगीकारतात. लोक स्मशान, मृत मानवी शरीराचे मांस, मृतदेहाची राख यांची घृणा करतात. म्हणून अघोरी त्याना स्वीकारतात. तुम्ही विचार करा ..जो मृतदेहाचे मांस खातो ..त्याची राख अंगाला फासतो..स्मशानात साधना करतो..राहतो त्याला या जगात दूसरे काय घृणास्पद वाटेल ? अघोर विद्या आणि तत्वज्ञान माणसाला इतक्या टोकाचा स्थितप्रज्ञ बनवते की त्याच्या ठाईचा आप-पर भाव पूर्ण नाहीसा होऊन सकल विश्वाकडे तो एका विशाल समदृष्टीने पाहू लागतो. खरा अघोरी हा समाजापासून पूर्ण अलिप्त असतो आणि आपल्या साधनेमध्येच मग्न असतो. आपल्या विद्येचा उपयोग तो फक्त जनकल्याणासाठीच करतो.

अघोरींच सोंग घेऊन काही भामटे आपल्याला ठकवु शकतात. मागील वर्षी एका भामट्या अघोर बाबाने अथनी जि. बेळगाव इथ कल्लोळ उडवून दिला होता. वृत्तपत्रात ही घटना खुप गाजली होती. ही त्या बातमीची लिंक -

http://www.tarunbharat.com/?p=42252

पण जे खरे अघोर साधू असतात ते असली हीन कृत्ये कधीच करत नाहीत. निसंग निर्लेप जीवनशैलीचा त्यांनी अंगीकार केलेला असतो. त्यांना ओळखण्याची महत्वाची खुण म्हणजे ते तुम्हाला कधीच काही मागणार नाहीत. पैसा अन्न कपड़ालत्ता अगदी धनाची रास त्यांच्यापुढे ओतली तर ते ढुंकूनही पाहनार नाहीत.

अश्या या गूढरम्य अघोर साधूंची साधना, त्यांची दैवते आणि आणखी रोचक माहिती जाणून घेऊ पुढील लेखात...
(क्रमश:)

सुहास भूसे
(दि. 16 -5-2015)


No comments:

Post a Comment