About

Monday 24 July 2017

माझी देवपूजा

"आज श्रावण सोमवार आहे तेव्हा आज देवपुजा तुम्ही करा"
आमच्या कलत्राने सकाळी सकाळी असा अध्यादेश जारी करत वातावरण तंग करून सोडले. तसा मी अगदीच नास्तिक नाही. सहज जाणे झाले तर देवळातही जातो, नमस्कार करतो. पण पूजा, फुलं वाहणे, प्रदक्षिणा वगैरे आवाक्याबाहेरचे प्रकार, थोडक्यात देखल्या (दिसला तरच) देवाला दंडवत असा प्रकार.

पण कालच्या घमासान चर्चेत घरकामात मदत करायची म्हटलं की मी फडणवीसला कर्जमाफी मागितल्यासारखा चेहरा करतो, तो तुमचा अमका मित्र बघा, तो तमका भाऊ बघा असे मुद्दे पुढे आले. थोडक्यात इतर लोक घरकामात चीन आहेत तर मी 10 दिवसांचा दारुगोळा उरलेला भारत आहे असा निष्कर्ष काढला गेला. त्यावर भक्तांच्या राष्ट्रप्रेमाने भारलेल्या विजीगीषु बाण्याने मी चवताळून गर्जना केली की उद्यापासून जोरदार घरकाम अंगावर घेतले जाईल. त्याच पडत्या फळाची आज्ञा घेऊन हा अध्यादेश निघाला होता. मोदी वाटेल ती आश्वासने देऊन जनतेला फसवू शकतात पण बायकोला फसवणे इतके सोपे नसते हे त्यांना जसोदाबेन सोबत असत्या तर चांगलं कळलं असतं.

तर मन मारून अडवाणी जसं कोविंद यांचं अभिनंदन करत होते तसं मी देव्हाऱ्यापुढं उभा राहिलो. मुलांचं आवरत आवरत कलत्राच्या सूचनांचा सपाटा कानावर कोसळत होता. बेल वाहा, फुलं वाहा, धूप लावा, अगरबत्ती, कापूर लावा, गंधाच्या डब्या तिकडे ठेवल्या आहेत. आज शिवामुठ तांदूळ आहे ... यांव त्यांव ...वगैरे. त्या गाईडलाईन फॉलो करत कामगिरी पार पाडायची होती.

तर अस्मादिक सावरून देव्हाऱ्यापुढं उभे राहिले. देव्हाऱ्यात 33 कोटी देवांची मांदियाळी माजली होती. जागेची टंचाई व देवांची खचाखच गर्दी पाहता हा आमच्या गावातल्याऐवजी मुंबईतला देव्हारा वाटत होता. काय त्या पूजेचे अवडंबर माजवते ही.. हाय काय अन नाय काय.. दोन मिनिटांत होत्याचं नव्हतं करून टाकतो. असं पुटपुटत मी बेल, फुल, गंध जे हाताला लागेल ते जिथं मोकळी जागा दिसेल तिकडे ठेवून दिले. सुमारे साडे बहात्तर सेकंदात यथासांग देवपूजा आटोपून मी छाती काढत दिवाणखान्यात सोफ्यावर जाऊन बसलो. व पायावर पाय टाकत ऐटीत चहाची वाट पाहू लागलो.

पण चहाऐवजी आतून "अहो, काय करून ठेवलय हे, इकडे या पटकन" अशी भीमगर्जना ऐकू आल्याने मी दबकत दबकत आत गेलो.
" अहो, देव कुठं आहेत, फुल कुठं वाहिलीत? धूप विझलाय ? बेल कोणाला वाहतात ? पिंडी दिसते का कुठं आहे ? काय प्रकार आहे हा ? ***, ****, ***, ****, "
या माऱ्याने मी पुरता बावचळून गेलो. आधीच ही ट्रम्प तात्या मीडियावर चिडून असतात तशी तुंबलेली त्यात मोदीने नोटबंदी करून देशात धुमाकूळ माजवून दिल्यासारखा मी देव्हाऱ्यात धुमाकूळ माजवला होता. ड्यामेज कंट्रोल साठी पुन्हा देवपूजा करणं भाग होतं.
मग ही रखुमाई सारखी कमरेवर हात ठेवून शेजारी उभी राहिली..

"चला मी सांगते तसं करा, एक एक फुल घेऊन एका एका देवाच्या डोक्यावर व्यवस्थित ठेवा."
मी आपलं स्वयंसेवक जसं स्वतःच डोकं न चालवता सरसंघचालकांच्या आदेशाचे निमूट पालन करतात तसं करण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरू केली.
"पिंडी शोधा आधी, ती बघा भैरवनाथाच्या मागे आहे. अहो, तिथं नव्हे तो जोतिबा, छे तो खंडेराया, घोड्यावर बसलेले सगळेच देव भैरोबा नसतात, हां हां ...आता तिला बाहेर पाटावर ठेवा, पाणी वाहा, बेल वाहा.. अमुक *** तमुक *** यांव ** त्यांव "
सुमारे साडे तेवीस मिनिटे निकराची झुंज दिल्यावर रखुमाईने कमरेवरचे हात खाली घेतले व समाधानाने मान डोलावली.
" याला म्हणतात पूजा, आता कसं प्रसन्न दिसतोय बघा देव्हारा "

मी घाम पुसत आजवर पूजा करणाऱ्या भटजींवर तोंडसुख घेतल्याचा मनातल्या मनात पश्चाताप व्यक्त करत देवपूजा म्हणजे खायचे काम नव्हे आणि आपले तर खचितच नव्हे असा निष्कर्ष काढत उद्यासाठी सोप्यातले सोपे कोणते घरकाम अंगावर घेता येईल याचा विचार करण्यात गुंग झालो.
©सुहास भुसे

No comments:

Post a Comment