About

Sunday 23 July 2017

अभ्यासू ब्राह्मण

एका गावात देवेंद्रपंत नावाचा एक दशग्रंथी ब्राह्मण राहत होता. स्नान, संध्या, जपतप सगळं सोवळ्यात काम. कोणत्याही गोष्टीची अभ्यासाच्या नावाखाली अतिचिकित्सा करून प्रश्न लोंबकळवत ठेवण्याची त्याला उत्तम हातोटी होती.

एक दिवस नदीवर गेला. स्नान करून ओल्या वस्त्रात परतताना पायाखाली एक चिंधी आली. देवेंद्रपंतांचे अभ्यासू चिकित्सक मन जागे झाले. ही चिंधी कोणाची ? स्पृश्याची की अस्पृश्याची ?
शंकेला जागा नको म्हणून पंत पुन्हा नदीवर गेले व चार बुड्या मारल्या. ओंजळीत पाणी घेऊन आचमन करताना भाताचे एक शीत तोंडात गेले. झालं. देवेंद्रपंतांचे चिकित्सक मन पुन्हा जागे झाले. हे कुणाचं खरकट ?
या प्रश्नाचा आता समूळ अभ्यास केला पाहिजे.

शीत कोणाचे याचा अभ्यास करण्यासाठी देवेंद्रपंत नदीकाठाने वर निघाले. चांगले पाच सहा मैल चालत गेल्यावर वरच्या अंगाच्या गावात काही लोक मोठं मोठी भांडी धूत होते.
पंतांनी विचारलं, भाताचे भांडे तुम्हीच घासले का ?
लोक म्हणाले, हो.
पंतांनी पुढचा अभ्यासू प्रश्न केला. 'कशाचे जेवण होते ?'
लोक म्हणाले, ' पाटलाच्यात काल जागरण गोंधळ होता, पाच बोकडं कापली होती. त्याचीच भांडी आम्ही धूत होतो.'
पंत कुचमले. शिव शिव म्हणत नदीत पुन्हा चार बुड्या मारल्या.

हा सगळा प्रकार होईपर्यंत त्यांना चांगलीच भूक लागली होती. गावात एखादे ब्राह्मणाचे घर आहे का याचा अभ्यास करून आधी जेवले पाहिजे बुवा.
विचारत विचारत पंत एका घरासमोर आले. घरातून बाई म्हणाली,
'हो, हे ब्राह्मणाचे घर आहे.'
भरपेट जेवण झालं. सगळं व्यवस्थित झाल्यावर बाईनी विचारलं,
'तुम्ही फार अभ्यासू दिसता तोंडावरून. मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला योग्य मार्ग दाखवा.'
पंत म्हणाले बोला.
बाई म्हणाली, ' माझा नवरा ब्राह्मण आहे व मी मुसलमानाची आहे. त्यामुळे प्रश्न असा निर्माण झालाय की आमचा जो मुलगा आहे त्याची सुंता करावी कि मुंज ?'

पंत पुन्हा कुचमले. चिकित्सक मन जागृत झालं. प्रायश्चित्त म्हणून जंगलात जाऊन तपोभ्यास करावा म्हणून स्वारी निघाली.
जंगलात अभ्यास करता करता रात्र झाली.
देवेंद्रपंत आपलं पोट सावरत एका झाडावर चढले.
वर जाताना एका फांदीवरून पाय घसरला. पंत फांदीच्या जाळ्यातून खाली पडू लागले.
पडता पडता हाताला एक फांदी लागली. पंत तिला पकडून लोंबकाळू लागले.
आता काय करावे ? बिकट प्रश्न असला तरी अभ्यास केल्याशिवाय निर्णय कसा घ्यायचा बरं ? खाली खोल दरीच असली म्हणजे ?
देवेंद्रपंत रात्रभर त्या फांदीला धरून लोंबकळत राहिले.
सकाळी फटफटल्यावर खाली पाहतात तो दोन फुटावर जमीन !

:- साठा उत्तराची कहाणी.. अभ्यास पूर्ण झाल्यावर सगळी चिकित्सा करून पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करण्यात येईल.

©सुहास भुसे


No comments:

Post a Comment