About

Saturday, 5 September 2015

चिकित्सेला विरोध का ?

     आज सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व त्यानिमित्त साजरा होणारा शिक्षक दिन. आज शिक्षक दिन साजरा करू नये राधाकृष्णन यांचे कार्य विवाद्य आहे तर त्यांच्यापेक्षाही काहीजणांचे उदा. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे असे मानणारा व तसे ठासून मांडणारा एक मोठा विचारप्रवाह आज दिसून आला.  तर अश्या प्रकारच्या पोस्ट किंवा विचार मुद्दाम ब्राह्मण समाजाला टारगेट करून केल्या जातात किंवा मुद्दाम चिखलफेक केली जाते अश्या स्वरूपाचे दुसऱ्या बाजूने प्रत्युत्तर दिसून आले. या वादात थेट मत देण्यापेक्षा मी एका वेगळ्या मुद्द्याकडे लक्ष वेधून घेऊ इच्छितो.

     एक महत्वाचा प्रश्न असा की सर्वच ब्राह्मण व्यक्तींवर टीका केली जाते का ? राजकीय क्षेत्रात आगरकरांवर, एसेम जोशींवर कधी अशी टीका दिसली नाही किंवा इतिहासात खंडोबल्लाळ, पंताजी गोपीनाथ, राहुजी सोमनाथ, थोरला बाजीराव पेशवा यांच्यावर कधी टीका दिसली नाही. इतिहास लेखन क्षेत्रात वा सी बेंद्रे, कमल गोखले, नर फाटक, सेतू माधव पगडी यांच्यावर कधी टीका दिसली नाही. मग सर्वच ब्राह्मण व्यक्तींना मुद्दाम टारगेट केले जाते म्हणण्यात कितपत तथ्य आहे ? रामदास, दादोजी, टिळक, सावरकर, राधाकृष्णन, पुरंदरे, राजवाडे यांच्यावर टीका होत असेल तर ती का होत आहे हे ही समजून घेतले पाहिजे. ब्राह्मण आहेत म्हणून टीका होते म्हणणे म्हणजे पळवाट झाली. जेव्हा एखादा आदर्श समाजापुढे ठेवला जातो तेव्हा तो समाजातील सर्वच स्तरांना आदर्श वाटायला हवा. आदर्श हा सर्वमान्य होण्यासाठी तो सार्वत्रिक हवा. तो जर एखाद्या जातीपुरता किंवा समाजगटापुरता मर्यादित असेल तर काही स्तरांतून विरोध होणे साहजिक आहे. नको इतके अनावश्यक उदात्तीकरण काळाच्या कसोटीवर तर टिकत नाहीच शिवाय एकासाठी उदात्त असणारी व्यक्ती दुसऱ्यासाठी तिरस्कृत ठरते. चिकित्सेचा आग्रह धरणे चूक कसे ? उलट मी तर ही एक संधी मानेन. होत असणारे आरोप कसे चूक आहेत हे शांतपणे पुरावे देऊन खोडून काढण्याची संधी. या व्यक्तींचा अपमान न करता, शिवीगाळ न करता पुरावे देऊन सत्य तेच मांडून कोणी चिकित्सा करत असेल तर त्याला विरोध का व्हावा ?

     याला उत्तर म्हणून फुले शाहू आंबेडकर यांच्यावर टीका केली तर चालेल का असा प्रश्न विचारला जातो किंवा थेट केलीही जाते. अवश्य केली जावी. जे संयत भाषेत सत्य गोष्टी पुराव्यादखल मांडून चिकित्सा होत असेल तर ती व्यक्ती कोणीही असेल विरोध करण्याचे कारण नाही. उलट चिकित्सा केली म्हणून आकांडतांडव केल्याने होत असलेल्या आरोपांना उत्तर नसल्याचा भास निर्माण होतो. किंवा मांडलेल्या गोष्टी निर्विवाद कबूल आणि सत्य असल्याचा संदेश समोरच्या बाजूला मिळतो.

     समाजापुढे एकेकाळी आदर्श म्हणून मांडलेल्या व्यक्तीची चिकित्सा व्हावी व त्यातून तिची महानता अधिक ठळकपणे समोर यावी. जे आदर्श या कसोटीत टिकणार नाहीत ते काळाच्या ओघात आपोआप बाजूला पडतील. या सर्व चिकित्सा, मंथन प्रक्रियेतून समाजापुढे सार्वत्रिक सर्वसंमत आदर्श ठेवले जावेत. ज्यायोगे विविध जातीपाती, धर्म, समाजगटातील दरी कमी होऊन एकजिनसीपणा येण्यास मदत व्हावी या उदात्त सकारात्मक हेतूसाठी सर्व चिकित्साप्रक्रियेचे स्वागत करायला हवे.

     ©सुहास भुसे    


एक होती लोकशाही

     भारतीय लोकशाहीने पाहता पाहता पासष्टी गाठली आहे. पण जितकी जुनी होते आहे तितकी ती परिपक्व होते आहे का ? की उत्तरोत्तर तिची अपरिपक्वताच वाढत चालली आहे ? खरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. देशात धार्मिक उन्माद वाढत चालला आहे. जातीपाती वगैरे समस्या जैसे थे आहेत. नव्हे उलट जातीय अस्मिता आधी कधी नव्हत्या इतकी मान वर काढत चालल्या आहेत. राजकारण म्हणजे तर सामान्य लोकांसाठी फक्त टीकेचा आणि कलंकित विषय बनला आहे. सर्व समाजाने ज्यांच्याकडे आशेने पाहावे अशी आदराची स्थाने कमी होत चालली आहेत. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी अश्या विचारवंतांचे राजरोस खून पाडले जात आहेत. ही वाटचाल फारशी आशादायक नाही.

     धर्म, जात यात आपल्या जाणीवा संकुचित करून टाकण्याच्या काळात लोकशाही मूल्यांबाबत प्रबोधन ही गरजेची बाब होऊन बसली आहे. शालेय अभ्यासक्रमातला २० गुणांचा नागरिकशास्त्र विषय १०० गुणांचा करण्याची हीच वेळ आहे. संपूर्ण जगाने सार्वभौम लोकशाहीची कल्पना ज्या ग्रीस कडून उचलली त्या ग्रीसचे हजारो वर्षापूर्वीचे समृद्ध लोकशाहीचे तत्वज्ञान आजही आपल्याला ललामभूत ठरावे. “ मी अथीनियन नव्हे, मी ग्रीक नव्हे, मी जगाचा नागरिक आहे.” हे महान ग्रीक तत्वज्ञ सोक्रेटीसचे उद्गार आहेत.
सॉक्रेटीस

     एक मजेशीर पण उद्बोधक किस्सा.

     अथेन्स मधला लोकशाहीचा प्रारंभ काळ. कारभार चालवण्यासाठी दरवर्षी चिठ्ठ्या टाकून लकी ड्रो पद्धतीने ५०० लोकांचे एक मंडळ निवडण्यात येई. एका सभासदाला दोनदा काम करण्याची संधी मिळे. या पद्धतीने प्रत्येक नागरिक कधी ना कधी या प्रक्रियेचा घटक बनतच असे. हे ५०० लोक दर दहा दिवसांनी एक सभा घेऊन त्यात विविध समस्यांवर चर्चा करून निर्णय घेत असत. या लोकांना जर या ५०० जनात कोणी अयोग्य वाटत असेल किंवा जनहितविरोधी कारवाया करत असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी एक पद्धती होती. त्यानुसार अश्या अयोग्य सभासदांसाठी नकारात्मक मतदान घेतले जाई. खापराच्या तुकड्यावर नाव कोरून मत दिले जाई त्याला ऑस्राकॉन म्हणत. यात ज्या सभासदाला सर्वात जास्त मते मिळत त्याला दहा वर्षे अथेन्स सोडून जावे लागत असे.

     अरिस्टेडेस ( aristedes bc 530 to bc 468 ) नावाचा एक सांसद तेव्हा न्यायी, न्यायी म्हणून खूप गाजला होता. पण या कीर्तीचा त्याला थोडा गर्व झाला. तो त्याच्या वर्तनातून जाणवू लागला. तेव्हा सभासदांनी त्याची ही ‘ग’ ची बाधा उतरवायची ठरवली. या सभेसाठी जात असताना अरिस्टेडेस एका शेजारून चाललेल्या सभासदाशी बोलत होता. तो सभासद अरिस्टेडेसला ओळखत नसल्याने अरिस्टेडेसच्या तोंडावरच त्याने त्याची निंदा सुरु केली. व शेवटी म्हणाला या अरिस्टेडेसचा माज आज मी उतरवणार. त्याच्या विरोधी मतदान करणार. अस म्हणून त्याने स्वत:ला लिहिता वाचता येत नसल्याने मतदान करण्यासाठी नाव लिहून द्यायला खापराचा तुकडा अरिस्टेडेस पुढे धरला. क्षणभर हसून न्यायी अरिस्टेडेस ने आपल्या कीर्तीला जागत त्या तुकड्यावर त्याला आपले नाव लिहून दिले व त्यादिवशी झालेल्या मतदानात अरिस्टेडेस बहिष्कृत झाला. आणि तो फक्त एका मताने ! जे त्याने स्वत: च्या हाताने लिहून दिले होते.

     ही खरी समृद्ध लोकशाही आणि परिपक्व नेते व जनता ! ज्यांनी आपल्याला निवडून दिले आहे त्यांनी आपल्याला विचारलेला जाब केलेली टीका ज्या राजकारण्यांना सहन होत नाही त्यांनी खूप काही घेण्यासारखे आहे ना अरिस्टेडेस कडून. भारतीय लोकशाही देखील ही उंची लवकरच गाठो ही अंती शुभेच्छा !

     ©सुहास भुसे  

अरिस्टेडेस