About

Sunday 1 November 2020

इन टू द वाईल्ड

 क्रिस्टोफर मॅक्केंडलेस नावाचा युवक युनिव्हर्सिटीमध्ये टॉप करतो आणि रूढार्थाने सुखवस्तु मानल्या जाणाऱ्या जीवनाच्या सर्व संधी नाकारून एका एडवेंचर साठी निघतो .. 

आय डी कार्ड, लायसन्स, बँक पासबुक, चेकबुक, बर्थ सर्टिफिकेट इ आपल्या जिवंत असण्याचे सर्व पुरावे नष्ट करून..

स्वतःची सर्व शिल्लक चॅरिटी करून..

मागचे सर्व दोर कापुन टाकून..

आपल्या मुळांच्या शोधात ..

इन टू द वाईल्ड..

अलास्काच्या जंगलात.

एकटाच. अगदी गरजेच्या बोटावर मोजण्याइतक्या वस्तु घेऊन. 


जगात सगळी माणसं एकमेकांना डॉमीनेट करण्याचा प्रयत्न करत असतात. या न त्या मार्गाने आपले विचार, आपल्या कल्पना ते इतरांवर थोपत असतात. आई बाप मुलांना डॉमीनेट करतात. नवरा बायकोला, बायको नवऱ्याला डॉमीनेट करते. मालक नोकरांना, राजकारणी जनतेला, श्रीमंत गरिबाला..

प्रत्येकजण प्रत्येकाला ..

इथं कोणीही स्वतंत्र नाही. सुखी जीवन म्हणजे काय याचे नॅरेटिव्हज व्यवस्थेने सेट केलेले असतात.

नोकरी, व्यवसाय, पैसा, चैन ..

सुख म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, यश म्हणजे काय, जीवन म्हणजे काय हे कोणी स्वतः ठरवत नाही. ही सगळी नॅरेटिव्हज आपल्यावर न कळत्या वयापासून थोपली जातात.


ही सगळी व्यवस्था आणि व्यवस्थेने सेट केलेले नॅरेटिव्हज झुगारून देऊन खराखुरा मोकळा श्वास घेण्याची, खरं खुर स्वातंत्र्य उपभोगण्याची कहाणी आहे ..

इन टू द वाईल्ड..


क्रिस्टोफर मॅक्केंडलेस अलास्काच्या जंगलात जातो.. त्याआधी दोनेक वर्ष फिर फिर फिरतो. कसल्याही पासपोर्ट व विजा शिवाय.. कधी चालत, कधी रेल्वेच्या डब्यात चोरून, कधी लिफ्ट मागून, कधी बोटीतून..

तो हॉटेलमध्ये वेटरच काम करतो, पुस्तके विकतो, गव्हाचे भले थोरले हार्वेस्टर चालवतो.. ही भटकी जिंदगी जगत असतानाच त्याची त्याच्या अंतिम ध्येयाकडे वाटचाल सुरू असते..

इन टू द वाईल्ड.. अलास्का.


अलास्का मध्ये क्रिस्टोफर कसं सर्वाईव्ह करतो. आपले पुर्वज जसे जंगलात राहत होते तसा कसा राहतो, तिथं त्यानं घेतलेला मोकळा स्वतंत्र श्वास, त्यानं अनुभवलेला निसर्ग, त्याचा जीवनानुभव आणि त्याचं तत्वज्ञान हे त्याच्याच शब्दात वाचायला हवे .. इन टू द वाईल्ड कादंबरीत किंवा त्याच नावाच्या क्रिस्टोफर मॅक्केंडलेसच्या चरित्रावर आधारित सिनेमामध्ये ..


आपण अनेक प्रकारचे बंडखोर पाहिले आहेत.. व्यवस्था बदलणारे, बदलण्याचा प्रयत्न करणारे. 

पण व्यवस्था पूर्णपणे उलथून टाकणारा, व्यवस्था कोलणारा क्रिस्टोफर मॅक्केंडलेस हा फार आगळा वेगळा बंडखोर आहे. क्रिस्टोफरचं जीवनदर्शन आपले अंत:चक्षु उघडतं.. आपल्याला अंतर्मुख करून टाकतं.

No comments:

Post a Comment