About

Sunday 1 November 2020

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

 आपल्याकडे भावना दुखावणे या प्रकाराचे भयंकर प्रस्थ आहे. एखाद्या सिनेमातून जरा काही इकडं तिकडं झालं की आपल्या भावना दुखावतात. तुलनात्मक दृष्ट्या ख्रिश्चन लोक या बाबतीत सर्वाधिक मवाळ असावेत.


उदाहरणदखल ... युरोट्रीप नावाचा एक विनोदी सिनेमा आहे. त्यातल्या नायकाचे व नायिकेचे इ मेल वरून प्रेम जुळते व अमेरिकन नायक जर्मन नायिकेला भेटण्यासाठी युरोट्रिपवर निघतो. तिच्या घरी गेल्यावर त्याला कळतं की ती एका टूर सोबत रोम ला गेली आहे. नायक व त्याचे मित्र ही रोमला पोहोचतात..


आता महत्वाचं.. व्हॅटिकन सिटी हे ख्रिश्चन धर्मियांचे सर्वात मोठे धार्मिक स्थळ. जिथं पोपचा निवास असतो. इथं नायिकेला शोधत नायक सिस्टीन चॅपेलमध्ये -थोडक्यात व्हॅटिकन सिटीच्या अतिपवित्र गाभाऱ्यातच- घुसतो. तिथं त्याचा मित्र ती घंटा वाजवतो जी पोपचं निधन झाल्यानंतर वाजवली जाते. बाहेर सर्व लोक पोपचं निधन झालं असं समजतात. दोघे मिळून पोपची टोपी व झगा घालून माकडचेष्टा करतात. टोपीला आग लागते. मित्र ती टोपी फायरप्लेस मध्ये टाकतो. या फायरप्लेस मधुन पांढरा धुर येणे हा जुन्या पोपच्या निधनानंतर नवीन पोपची निवड झाल्याचा संकेत असतो. पुन्हा बाहेरचा जमाव गैरसमजात येतो. पोपचा धर्मदंड हातात घेऊन व पोपचा झगा व टोपी घालून नायक ज्या सज्जातुन पोप जनतेला दर्शन देत असतात तिथं येऊन लोकांना अभिवादन करतो. लोक त्यालाच पोप समजतात वगैरे...


आणि हे सगळं कशासाठी ? निव्वळ टुकार, पाचकळ विनोदनिर्मितीचा अश्लाघ्य प्रयत्न..


अखेर एकदाचं तो नायिकेला प्रपोज करतो. ती हो म्हणते ते दोघं थेट घुसतात चर्च मधल्या त्या केबिनमध्ये जिथं पाद्री लोकांचे कन्फेक्शन ऐकत असतात. आणि अर्थातच तिथं सेक्स करतात.


हे सगळं किंवा यातला नखभर देखील भाग मुस्लिम, हिंदु किंवा इतर धर्मियांच्या श्रद्धास्थानाबाबत झाला असता तर काय झालं असतं याची कल्पना करून पाहावी.. भारतातील एखाद्या सिनेमात असं काही दाखवलं गेलं असतं तर काय घडलं असतं ?


आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नुसत्या गप्पा हाकतो.. आपल्याकडे ते येणे कालत्रयीही शक्य नाही हे वास्तव आहे. पाश्चात्य लोक त्याच्या तात्विक चर्चा करत नाहीत तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य जगतात.

No comments:

Post a Comment