About

Sunday, 23 July 2017

अभ्यासू ब्राह्मण

एका गावात देवेंद्रपंत नावाचा एक दशग्रंथी ब्राह्मण राहत होता. स्नान, संध्या, जपतप सगळं सोवळ्यात काम. कोणत्याही गोष्टीची अभ्यासाच्या नावाखाली अतिचिकित्सा करून प्रश्न लोंबकळवत ठेवण्याची त्याला उत्तम हातोटी होती.

एक दिवस नदीवर गेला. स्नान करून ओल्या वस्त्रात परतताना पायाखाली एक चिंधी आली. देवेंद्रपंतांचे अभ्यासू चिकित्सक मन जागे झाले. ही चिंधी कोणाची ? स्पृश्याची की अस्पृश्याची ?
शंकेला जागा नको म्हणून पंत पुन्हा नदीवर गेले व चार बुड्या मारल्या. ओंजळीत पाणी घेऊन आचमन करताना भाताचे एक शीत तोंडात गेले. झालं. देवेंद्रपंतांचे चिकित्सक मन पुन्हा जागे झाले. हे कुणाचं खरकट ?
या प्रश्नाचा आता समूळ अभ्यास केला पाहिजे.

शीत कोणाचे याचा अभ्यास करण्यासाठी देवेंद्रपंत नदीकाठाने वर निघाले. चांगले पाच सहा मैल चालत गेल्यावर वरच्या अंगाच्या गावात काही लोक मोठं मोठी भांडी धूत होते.
पंतांनी विचारलं, भाताचे भांडे तुम्हीच घासले का ?
लोक म्हणाले, हो.
पंतांनी पुढचा अभ्यासू प्रश्न केला. 'कशाचे जेवण होते ?'
लोक म्हणाले, ' पाटलाच्यात काल जागरण गोंधळ होता, पाच बोकडं कापली होती. त्याचीच भांडी आम्ही धूत होतो.'
पंत कुचमले. शिव शिव म्हणत नदीत पुन्हा चार बुड्या मारल्या.

हा सगळा प्रकार होईपर्यंत त्यांना चांगलीच भूक लागली होती. गावात एखादे ब्राह्मणाचे घर आहे का याचा अभ्यास करून आधी जेवले पाहिजे बुवा.
विचारत विचारत पंत एका घरासमोर आले. घरातून बाई म्हणाली,
'हो, हे ब्राह्मणाचे घर आहे.'
भरपेट जेवण झालं. सगळं व्यवस्थित झाल्यावर बाईनी विचारलं,
'तुम्ही फार अभ्यासू दिसता तोंडावरून. मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला योग्य मार्ग दाखवा.'
पंत म्हणाले बोला.
बाई म्हणाली, ' माझा नवरा ब्राह्मण आहे व मी मुसलमानाची आहे. त्यामुळे प्रश्न असा निर्माण झालाय की आमचा जो मुलगा आहे त्याची सुंता करावी कि मुंज ?'

पंत पुन्हा कुचमले. चिकित्सक मन जागृत झालं. प्रायश्चित्त म्हणून जंगलात जाऊन तपोभ्यास करावा म्हणून स्वारी निघाली.
जंगलात अभ्यास करता करता रात्र झाली.
देवेंद्रपंत आपलं पोट सावरत एका झाडावर चढले.
वर जाताना एका फांदीवरून पाय घसरला. पंत फांदीच्या जाळ्यातून खाली पडू लागले.
पडता पडता हाताला एक फांदी लागली. पंत तिला पकडून लोंबकाळू लागले.
आता काय करावे ? बिकट प्रश्न असला तरी अभ्यास केल्याशिवाय निर्णय कसा घ्यायचा बरं ? खाली खोल दरीच असली म्हणजे ?
देवेंद्रपंत रात्रभर त्या फांदीला धरून लोंबकळत राहिले.
सकाळी फटफटल्यावर खाली पाहतात तो दोन फुटावर जमीन !

:- साठा उत्तराची कहाणी.. अभ्यास पूर्ण झाल्यावर सगळी चिकित्सा करून पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करण्यात येईल.

©सुहास भुसे


Friday, 2 June 2017

ग्रामीण खाद्य जीवन

शीर्षटीप :- कमजोर ह्रदयाच्या आणि सोवळ्या लोकांनी स्वतःच्या जबाबदारीवर वाचावे.

मटण म्हटलं की आपल्याला दोनच प्रकार ठाऊक असतात. बोकडाचे किंवा कोंबडीचे.
ग्रामीण भागातले खाद्य जीवन पूर्वापारपासून या बाबतीत खूप समृद्ध आहे. रानडुकराची शिकार करून अत्यंत चवीने खातात लोक. डुकराचे मांस चवदार व चरबीयुक्त असते. ते खाताना चवीपुरतीच भाकरी भात घेतात लोक. बोकडाचे मटण ताटात. तर हे डायरेक्ट पातेलीच घेऊन बसतात. याची कातडी तर खोबऱ्यासारखी चवदार लागते असं जाणकार म्हणतात.  शिकारीत कातड्याच्या वाट्यावरून वाद होतात.
बरं रानडुकराचं वजन अफाट असतं. वाटे घालून, घरी खाऊन, पै पाहुणे बोलावून, गल्लीत वाटून ही संपत नाही. मग या मटणाचे लोणचे घालतात. पोर्कचे लोणचे हा अत्यंत चवदार व लोकप्रिय प्रकार आहे. त्याची किंमत 2000 ते 3000 रु किलो पर्यंत असते.

सश्याची शिकार हा तर पोरा ठोरांचा खेळ.
त्यासाठी लागणाऱ्या घरघुती मेडच्या वाघरी अर्थात जाळी गल्लोगल्ली उपलब्ध असतात. सश्याचे माग शोधणे, गवताचे खुडलेले शेंडे, मातीतली पावले हा शॉरलॉक होम्सच्या तोंडात मारणारा इंटरेस्टिंग प्रकार आहे. पोरं सगळा माल मसाला सोबतच घेऊन असतात. शिकार साधली की लगेच माळावरच त्याचा फन्ना उडवला जातो. कधी भाजून तर कधी तिकडेच तीन दगडांची चूल मांडून.

घोरपड ही क्वचित सापडणारी अपवादात्मक शिकार. त्यामुळे त्याला फार भाव. घोरपड छोटी असते बऱ्याचदा. म्हणून शिकारकरे गुपचूप कार्यक्रम करतात. घोरपड सापडली असं मंडळाला कळलं तर एक एक मणी वाट्याला येणे मुश्किल. घोरपडीच्या मटणापुढे बोकडाचे मटण म्हणजे अळूचे फदफदे.

तित्तर ही एक अशीच अवघड शिकार. हा पक्षी फार चलाख व चतुर असतो. म्हणून याला चतुर असही म्हणतात. याचे खास पिंजरे असतात. महिनोन महिने नजर ठेवून मोक्याच्या जागी ते लावले जातात. तित्तराचा लेगपीस खाताना खाद्यानंदी टाळी लागते. काळ्या तिखटातला त्याचा रस्सा तर ओरपुन ओरपुन पितात. ताटे फोडून खातात.

पारवे, होले हे स्टार्टर म्हणून वापरतात. ड्रिंक वगैरे करत असाल तर चखना म्हणून भाजलेले होले खाणे हा जेवणावर कडी करणारा प्रकार आहे. होले खाण्याच्या नादात प्रसंगी ग्लास तसाच भरलेला राहून जातो.

पाऊस पडला की ओढ्या नाल्यांना खेकड्यांची शिकार केली जाते. काठावर बिळे असतात. त्यात बाहेरची पावलवट ओळखून आत खेकडा आहे की नाही हे हेरतात. क्वचित त्या बिळात साप असण्याचा धोका असतो. एकदा कोणत्या बिळात खेकडा आहे कळलं की पुढे खूप सोपा प्रकार. एक गवताची काडी बिळात घालून हलवायची. खेकड्याने ती पकडली की पटकन बाहेर काढून खेकड्याची नांगी मोडायची आणि पाटीत टाकायचा. चांगला एरिया असेल तर तासाभरात पाटी भरते. त्यात जर एखादी गाभण मादी मिळाली तर शिकारकरे भयंकर खुश होतात. गाभण मादीला अमृततुल्य चव असते असं त्याचं निरीक्षण असत.

अजून बऱ्याच प्राण्यांच्या- पक्षांच्या शिकारी साधण्यात ग्रामीण भारतीय वस्ताद आहेत. वरील शिकारी फक्त देशावरच्या आणि पठारी भागातल्या. कोकणात आणि जंगल जवळ असणाऱ्या भागात अजूनच व्हरायटी असते शिकारींमध्ये. भटक्या विमुक्त जमातींत तर वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण तऱ्हा आहेत शिकारींच्या. उदा. कातकरी उंदरांची शिकार करतात. ढिगाने उंदीर पकडून मेजवानी करतात. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.
©सुहास भुसे