About

Thursday, 1 October 2015

धर्मभोळ्या मानसिकतेचा गैरफायदा

     मोदींचे मार्क झुबेरबर्ग ची भेट घ्यायला जाणे, त्याचवेळी मार्क एकेकाळी कसा भारतातल्या कोणत्या मंदिरात वगैरे गेला होता, त्यामुळे त्याचे फेसबुक जे तो बंद करणार होता ते कसे प्रगतीपथावर आले वगैरे किस्से प्रसूत होणे / करणे, ते भारतीय जनतेने प्रचंड डोक्यावर घेणे. एकीकडे हे सर्व सुरु तर दुसरीकडे डिजिटल इंडिया ला सपोर्टच्या नावाखाली डीपी तिरंगी करणाऱ्या लिंक खाली खुबीने दडवलेला internet .org चा कोड. ज्यावर क्लिक केले की आपोआप नेट न्युट्रलिटीच्या बाजूने मतदान होत होते. हा सर्व प्रकार पाहून खूप वैषम्य वाटले. कोणीही यावे आणि भारतीयांची नेमकी नस ओळखून असे गनिमी कावे करावेत आणि भारतीयांनी त्याला उत्साहाने बळी पडावे हा प्रकार कधी थांबेल ? कोणीही फसवावे इतके आपण मूर्ख आहोत काय?

     भारतीय लोकांची मानसिकता ओळखून त्यांना परदेशी लोकांनी फसवण्याचे प्रकार अर्थातच नवे नाहीत. एक फार उद्वेगजनक फसवणुकीचा ऐतिहासिक किस्सा सांगावासा वाटतो.

     इस १८४२ साली प्रसिद्ध अफगाण युद्ध झाले होते. इंग्रजांनी हिंदू सैनिकांच्या सहाय्याने ते जिंकले. जनरल नॉट हा त्या युद्धाचा हिरो होता. युद्ध खर्चाने जवळ जवळ दिवाळे निघाल्याने इंग्रजांना हिंदू सैनिकांचा थकलेला पगार देणे शक्य नव्हते. तेव्हा जनरल नॉट ने व गव्हर्नर जनरल एलनबरो ने भारतीय लोकांची धर्मभोळी मानसिकता ओळखून एक नामी शक्कल लढवली.

     त्यानुसार एक षड्यंत्र रचून एलनबरो ने भारतीय सैनिकांना पगारीऐवजी एक धार्मिक भेट द्यायचे कबूल केले. महंमदाने सोमनाथवर स्वारी करून देवळाचे चंदनी दरवाजे उखडून अफगाणिस्तान ला नेले होते ते परत आणून सोमनाथाच्या मंदिराला बसवू असे एलनबरोने जाहीर केल्यावर हिंदू सैनिकांत खुशीची लाट उसळली. मग एक फार्स रचण्यात आला. महंमदाच्या कबरीचे दरवाजे उखडून भारतात वाजत गाजत आणण्यात आले. मोठा समारंभ करून ते सोमनाथाच्या देवळाला बसवण्यात आले.हिंदू सैनिक आणि समस्त जनता देखील गव्हर्नर जनरल एलनबरोवर खूप खुश झाली.
काही कालानंतर मात्र या चंदनी दरवाज्याचे बिंग फुटले. तपासांती ते दरवाजे चंदनाचे नसून पाईनचे असल्याचे सिद्ध झाले. तसेच त्यावर कोरलेल्या अरबी लेखाने तर पुरता रहस्यभेद झाला. ते दरवाजे सोमनाथाच्या देवळाचे नव्हतेच हे पूर्णपणे सिद्ध झाले.

     धर्मभोळया मानसिकतेचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक व क्रूर थट्टा करण्याचा हा प्रकार डोळ्यात अंजन घालणारा आहे.

     मार्क झुबेरगर्ग मंदिरात गेल्यामुळे त्याची बुडणारी फेसबुक कंपनी वाचली ही न्यूज असेच धर्मभोळे भारतीय अभिमानाने शेयर करत होते तेव्हा मार्कचा हा तुफान यशस्वी मार्केटिंग फंडा पाहून त्याने हा जनरल नॉट चा ऐतिहासिक किस्सा नक्कीच वाचला असावा असे राहून राहून वाटत होते.
©सुहास भुसे.



Friday, 25 September 2015

सर्वेपि सुखिन: संतु । सर्वे संतु निरामया ।

सर्वेपि सुखिन: संतु । सर्वे संतु निरामया ।

     इंडिया असाच शायनिंग करत राहो. सोबतच भारताचेही थोडेफार धडभले होत राहो.

     त्यांच्या ४० मजली घरांचे ग्रिनीज बुकात रेकॉर्ड नोंद होवो ..
     पण आमच्या पांडबारावांचे घर खूप गळते. यंदा पावसाळ्यात तणसाने घर शाकारून घेण्याइतकी त्यांची ऐपत होवो.

     त्यांच्या पॉर्श, फेरारी ला भारतात आणण्याचे परवाने मिळोत ..
     पण आमच्या आनंदारावांचा एक बैल खूप थकलाय. यंदा सिझन ला जोडीला दुसरा बैल घेण्याची ताकद त्यांच्यात येवो.

     त्यांचे नऊ नऊ लाखांचे सूट अजून चमकत राहोत...
     पण आमच्या गण्याची गणवेशाची चड्डी दोन वर्षे वापरून बुडावर पार विगरून गेली आहे. पुढील वर्षी तरी त्याला नवीन गणवेश घेऊन देण्याची आर्थिक कुवत त्याच्या आईबापात येवो.

     त्यांच्या परदेश दौऱ्यासाठी, सहली, चिंतन सुट्ट्या, वर्ल्ड टूर साठी शुभेच्छा...
     पण आमचे मनोहरराव तिकिटाचे पैसे वाचवण्यासाठी २५ किमीवर राहण्याऱ्या आपल्या लेकीकडे चालत जातात. त्यांच्या पायातले बळ अक्षय राहो.

     त्यांच्या सर्दीवर परदेशात उत्तम उपचार होवोत...
     पण आमच्या कर्जबाजारी सदोबाची म्हाताऱ्याला लाखभर रु ऑपरेशन खर्च भरण्याची ऐपत नाही म्हणून सदोबाने त्यांना दवाखान्यातून घरी परत आणले आहे. त्यांचा शेवटचा प्रवास वेदनामुक्त व समाधानी होवो.

     त्यांच्या स्विमिंग तैंक मधले निळेशार पाणी पूर्ण विषाणूमुक्त राहो...
     पण आमच्या यमनाबाई, सखूबाई, गिरजाबाई तीन मैलावरील आटत चाललेल्या विहिरीतून पाणी आणतात. त्यांची घागर बुडण्याइतके पाणी त्या विहिराला अखंड राहो.

     एखादा तास वीज गेल्याने त्यांचा एसी बंद पडून त्यांच्या जीवाची तगमग न होवो...
     पण आमच्या गोविंदरावांचा वीजपंप दिवसातून दोन तास तरी सुरळीत चालावा एवढी सलग वीज त्यांना मिळत राहो. बाकी १८ तास लोडशेडींगमध्ये उकाड्यात झोपायला त्यांच्या मुलाबाळांना त्यांच अंगण तुझ्या दयेने प्रशस्त आहे.

     त्यांचे पोटातले पाणी न हालावे असे रस्ते, केबल्स, इंटरनेट,विज, पाणी आदी सुविधायुक्त इंफ्रास्ट्रक्चर पूर्ण बहराने पूर्ण होवो...
     पण आमचा हानमा गुडघ्याएवढ्या चिखलातून, काट्याकुट्यातून, 2 ओढे पार करून किराणा आणायला गावात जातो. त्याच्या वस्तीपर्यंत एक साधासा मुरुमाचा रस्ता तेवढा होवो.

     त्यांच्या स्मार्ट सिट्या शांघाय, बीजिंगच्या तोंडात मारतील अश्या उभ्या राहोत...
     सोबतच आमचे औंढी गांवही हागणदारी मुक्त होवो.

     त्यांच्या नवनव्या फॅक्टऱ्या उभ्या करण्यासाठी आय सी सी आय डी बी आय आदी बॅकांची फौज इंडस्ट्रियल कर्जाची पॅकेजेस घेऊन त्यांच्या दारात खेटे घालत राहो...
     पण यंदा पावसाने दगा दिल्याने आमच्या उमाजीरावाने बायकोचे मंगळसूत्र मोडून ही दुबार पेरणी व खतासाठी २० हजार उभे झाले नाहीत. त्यांची नड भागून त्यांच्यावर गळफास लावून घेण्याची वेळ न येवो.

     इंडिया त्यांच्या पैश्याच्या महापुरात पोहत असाच झगमगत राहो...
पण आमचा भारत फक्त नीटनेटक धडुत लेऊन, बऱ्यापैकी छपराखाली, पोटभर दोन घास खाऊन सुखी असो.

सर्वेपि सुखिन: संतु ।
सर्वे संतु निरामया ।।
सर्वे भद्राणि पश्यंतु ।
मा कश्चित दु:खभाद् भवेत ।।

©सुहास भुसे.