चार्वाक
हे कोणी एक व्यक्ती होते कि ती एक उपाधी होती कि जडवादी परंपरेतील सर्वच
अनुयायांना चार्वाक म्हणत असत याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. पण हे चार्वाक
दर्शन हिंदू परंपरेत सर्वात जास्त महत्वाचे गणले गेले आहे आणि इतर कोणत्याही
तत्वज्ञानाची झाली नाही इतकी चार्वाक तत्वज्ञानाची चर्चा हिंदू धर्मशास्त्रात झाली
आहे. चार्वाकांचे तत्वज्ञान हे देव आणि धर्म यांच्या नावावर लोकांचे शोषण
करणा-यांसाठी इतके धोकादायक होते कि नंतरच्या काळातील जवळ जवळ सर्व विचारधारांना
चार्वाक मताचे खंडण करणे महत्वाचे वाटले आहे. उपनिषदे ,बादरायणाची ब्रह्मसूत्रे
आदी अनेक ग्रंथात चार्वाक मताचे खंडन केले गेले आहे. साधारणत: इ.स. ६ व्या
शतकापर्यंत चार्वाक मतावर खंडण-मंडनाची ही परंपरा सभ्य आणि सुसंस्कृत चाकोरीतून
गेलेली दिसते. त्याचे खंडन करण्याचा प्रयत्न करणारांनी देखील चार्वाक विचारांचा
सन्मानच केलेला दिसतो.
महाभारतातील वनपर्वात द्रौपदी एक जुनी आठवण
सांगताना म्हणते कि “ माझ्या पित्याने मला चार्वाक दर्शनाचे
शिक्षण देण्यासाठी ह्या तत्वज्ञानातील अधिकारी व्यक्तीची नियुक्ती केली होती.”
आता राजा द्रुपदासारखा एक तात्कालिक मान्यवर
राजा आपल्या कन्येला शिक्षण देण्यासाठी चार्वाक संप्रदायाच्या गुरुची निवड करतो
म्हणजे त्या काळात चार्वाक परंपरा निश्चितच प्रतिष्ठित आणि लोकमान्य राहिलेली
असणार. पाणिनीने चार्वाक दर्शनाला अन्विक्षकी शास्त्रात स्थान दिले आहे. कृषी
,उत्पादन ,ऐहिक जीवन ,अर्थ अशी जीवनस्पर्शी शास्त्रे अन्विक्षकी शास्त्रात येतात.
यावरूनही आपल्याला चार्वाक दर्शनाचे तात्कालिक महत्व लक्षात येते. आद्य
शंकराचार्यांनीदेखील चार्वाक दर्शनाचा सन्मानच केला आहे. शंकराचार्य म्हणतात की
चार्वाकमत हे सर्वसामान्य जनतेचे मत आहे. शंकराचार्यांचा समकालीन असलेला जैन विचारवंत हरिभद्र म्हणतो, ‘ इंद्रियांच्या प्रत्ययाला येणारे जगत् व पदार्थसमूह म्हणजे लोक. हा लोक
ज्या तत्वज्ञानाचा आधार आहे ते म्हणजे
लोकायत.’ कौटिल्याने त्याला आपल्या तर्कशास्त्रात
स्थान दिले आहे. या सर्व संदर्भांवरून असे लक्षात येते साधारण
यापूर्वीच्या सर्व विचारवंतांना चार्वाकांचे विचार मान्य होते. मात्र इ.स ६ व्या
शतकानंतर मात्र या विचारांची टवाळी सुरु होऊन हे विचार दाबण्याचा प्रयत्न झाला.
![]() | ||||
| Dropadi by Raja Ravivrma |
चार्वाकांचे तत्वज्ञान
चार्वाक प्रत्यक्ष हेच प्रमाण मानतात. जी गोष्ट
दिसत नाही वा जिचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही अशी कोणतीही गोष्ट मान्य करण्यास
त्यांचा कडवा विरोध आहे. तात्कालिक धर्म परंपरा ही मोक्ष ,मुक्ती ,स्वर्ग अश्या
कल्पनांच्या मागे धावत होती. उपवास ,व्रतवैकल्ये ,जपजाप आणि कडक कर्मकांड ... आणि
एकूणच शरीराला कष्टवणारी धर्मसाधना म्हणजेच धर्माचरण असा लोकांचा समज करून देण्यात
आला होता. अशी कडकडीत साधना करणे वा इंद्रियनिग्रह म्हणजे स्वर्गात आपली जागा
राखून ठेवण्याचा राजमार्ग. चार्वाकांना मृत्यनंतरच्या तथाकथित सुखांसाठी जीवनाकडे
पाठ फिरवणारी ही फोल विचारसरणी अमान्य होती. त्यांनी आत्म्याचे अस्तित्व अमान्य
केले. स्वर्ग-नरक असल्या कल्पनांना केराची टोपली दाखवली. मृत्यू म्हणजेच मुक्ती हे
तत्वज्ञान त्यांनी मांडले.
चैतन्य हा आत्म्याचा गुण आहे. तथापि आत्मा नावाची
कोणती गोष्ट अस्तित्वात असल्याचे प्रमाणासहित सिद्ध करता येत नाही . त्यामुळे
अंतत: हा शरीराच गुण होतो. शरीर संपले कि चैतन्य संपले. सारे काही संपले. याची
सिद्धता त्यांनी तीन प्रकारे मांडली.
१) तर्क
२) अनुभव
३) आयुर्वेद शास्त्र
तर्क – चार्वाक मानतात कि शरीर जोवर असते
तोवरच त्यात चैतन्य खेळत असते. जेव्हा शरीर नष्ट होते तेव्हा हे चैतन्य कोठे दिसत
नाही वा त्याचे मृत्यूपश्चातचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही. या अनुषंगाने पाहीले
असता शरीर हाच आत्म्याचा एकमेव आधार आहे अर्थात आत्मा म्हणजेच शरीर.
अनुभव- मी स्थूल आहे, मी दुर्बल आहे, मी काळा
आहे, मी गोरा आहे, मी निष्क्रीय आहे, मी ताकदवान आहे, असे अनुभव आपल्याला
पावला-पावलाला येत असतात. स्थूलता-दुर्बलता इत्यादी शरीराचे धर्म आहेत आणि ‘मी’
देखील शरीराचाच धर्म आहे. पर्यायाने आत्मा म्हणजेच शरीर.
आयुर्वेद
शास्त्र-
ज्या प्रकारे गुळ आणि मोहरी यांच्या मिश्रणात कालांतराने विशिष्ट परीस्थितीमुळे
मादक गुणधर्म तयार होतात, ज्याप्रमाणे दही, पिवळी माती आणि शेण यांच्या मिश्रणात
कालांतराने विंचू उत्पन्न होतात, ज्याप्रमाणे कात, चुना, सुपारी, पान यांचे
सुयोग्य मिश्रण मुखात लालीमा उत्पन्न करते त्याचप्रमाणे चार महाभूतांचे विशिष्ट
मिश्रण विशिष्ट परिस्थितीमध्ये चैतन्याच्या निर्मितीस कारणीभूत होते. चार्वाक हे
फक्त पृथ्वी, तेज, जल, वायू ही चार महाभूते मानतात. आकाश हे महाभूत आहे हे त्यांना
मान्य नाही. इथे निर्दिष्ट करण्याची बाब म्हणजे चार्ल्स डार्विन ने सजीवांच्या
उत्पत्तीचे हेच कारण आपल्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतांत मांडले आहे. विशिष्ट
पोषक परिस्थितीत सजीवांची उत्पत्ती झाली हा त्याचा सिद्धांत चार्वकांनी फक्त काही
हजार वर्षापूर्वी या भारतभूमीत मांडला होता. इथेच त्यांचे श्रेष्ठत्व आणि
वैज्ञानिक दृष्टीकोन अधोरेखित होतो.
हे अंतर्गत घटकांचे प्रमाण बिघडले कि शरीरात
निर्माण झालेले हे चैतन्य नाश पावते, देह-आकार नष्ट होतात हाच मृत्यू. आत्मा हा
शरीराहून वेगळा आहे, तो या देहात येतो जातो असे मानणे वेडगळपणाचे आहे असे
चार्वाकांचे स्पष्ट मत आहे.
आकारामुळे निराकाराचा भास होतो. वस्तुत:
निराकार असे काही नाही. फक्त आकारच आहे. उदा अचानक उमटलेल्या ध्वनिमुळे आधी शांतता
होती असा भास होतो. शांतता असे काही नसते.
चारी पुरुषार्थात मोक्ष हा पुरुषार्थ सर्व
श्रेष्ठ मानला जातो. चार्वाकांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ मान्य
नाहीत. ते फक्त अर्थ आणि काम हे दोनच पुरुषार्थ मानतात. धर्म आणि मोक्ष यांना
चार्वकांनी बाद ठरवले आहे. पण धर्माला नाकारताना ते पारलौकिकाचे फळ देणारे साधन आहे म्हणून तो नाकारला
आहे . चार्वाकी विचारसरणीला पारलौकिकाचे वावडे आहे.
यज्ञ म्हणजे वेळ आणि द्रव्य यांचा अपव्यय,
एक व्यर्थ कर्मकांड असे चार्वाक मानतात. चातुर्वण्य व्यवस्थेला देखील चार्वकांनी
कडवा विरोध केला. कथित ऐतिहासिक रित्या येणारी वंशशुद्धी आणि तिच्यामुळे येणारा
अहंकार यावर चार्वकांनी कठोर टीका केली. वंश शुद्धी ही वस्तुस्थिती नसून एक आभास
आहे. समाजातले आपले उच्च स्थान टिकवण्यासाठी केलेला अपप्रचार आहे असे चार्वाक
मानतात.
चार्वाकांविषयी केल्या गेलेल्या
अपप्रचारामुळे चार्वाक हे अयोग्य आणि अनीती पसरवणारे तत्वज्ञान सांगतात अशी
अनेकांची समजूत झालेली दिसते. तथापि चार्वाक कोणतीही अयोग्य गोष्ट सुचवत नाहीत. उलट
चोरी, मद्यप्राशन, पशुहत्या, हिंसा इत्यादी गोष्टींचा त्यांनी धिक्कार केला आहे. धर्माच्या नावाखाली लोकांचे शोषण करणारे पुरोहित
हे चार्वाकांचे खरे टीकाविषय आहेत. लोकांचे रक्त पिवून जगणा-या असल्या लोकांचा
त्यांना प्रचंड तिटकारा आहे. माणसाने लबाडी करू नये, कोणाचे शोषण करू नये, आयत्या
पिठावर रेघोट्या ओढू नयेत. कष्ट करावे, शेती करावी, प्रामाणिक पणे श्रम करून
अर्थार्जन करावे आणि काव्य संगीत कला नृत्य यांचा आस्वाद घेत सुखनैव जीवन कंठावे
असा रोकडा सल्ला ते सामान्यांना देतात. दंडनिती, राजकीय स्थैर्य यातून लोक
नियंत्रण करीत शासकांनी स्वार्थ बुद्धी त्यजून लोकांचे आणि एकूणच समाजाचे हित
साधावे असे ते सुचवतात.
कृषीगोरक्ष वाणिज्यदंडनित्या दिभी: बुधै :
एतेरैव
सदोपायैतुर्भोगाननुभवेदृवि
(क्रमश:)
-सुहास भुसे


